किस्से आणि बरंच काही- तूच तुझ्या कामाचा शिल्पकार!

>> धनंजय साठे

वर्क लाइफ बालन्स हा प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा आहे. काम करावं, पण ताण घेऊन नाही. मर्यादा आखून काम केलं तर वैयक्तिक आयुष्यात कुटुंबासाठी आणि छंदासाठी वेळ काढणं सहज शक्य होतं. कारण जसं तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे तसंच कामाचाही शिल्पकार तूच आहेस हे विसरता कामा नये.

वर्क लाइफ बालन्स हा विषय इतक्यादा चर्चेत आलाय, पण तरीही बऱयाच जणांना याचं उत्तर सापडलेलं नाही. उदाहरणार्थ कोविडदरम्यानच्या लाकडाऊनच्या काळात ऑफिसची कामं घरून करायची सवय लागली, पण या सवयीमुळे घरच्यांसाठी असलेला वेळ आपण ऑफिसला देतोय का याचा विचार नक्कीच झाला पाहिजे. माझं वैयक्तिक उदाहरण घ्या. मी टीव्ही मालिकांचा क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून जवळपास सोळा हिंदी मालिकांची जबाबदारी पेलली. बहुतांश मालिका माझ्या नशिबाने अतिशय लोकप्रिय ठरल्या. ‘सोनपरी’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘दिया और बाती हम’ यांसारख्या प्रेक्षकांनी उचलून धरलेल्या मालिकांचा मी एक भाग होतो याचा अभिमान आहे मला. मी माझ्या बायको, मुलाचा हक्काचा वेळ मालिकावाल्यांना दिला हे सत्य मला नाकारता येत नाही. दुसरीकडे मग मीच माझी समजूत घालतो की, माझ्या कामाचं स्वरूपच असं आहे, त्याला मी काय करू? कामाची जबाबदारी झटकू तर शकत नव्हतो ना! म्हणजे वर्क लाइफ बालन्स करण्यात मी निश्चितच कमी पडलो हे मान्य करावंच लागेल.

परंतु वर्क लाइफ बालन्स या विषयाला आपण महत्त्व दिलं नसल्याचं आपल्याला कबूल नसतं. वर्क म्हणजे ज्या कामाचे आपल्याला पैसे मिळतात ते. म्हणजेच पगार मिळणाऱया कामाव्यतिरिक्त जो वेळ आहे तेच लाइफ आहे. म्हणजे त्यात कुटुंबासाठी वेळ, वैयक्तिक गोष्टींसाठी वेळ, छंद, वाचन, पाळीव प्राण्यांबरोबरचा वेळ इत्यादी महत्त्वाचं आहे, पण आपण तो वेळ वर्कमध्ये मोजतो. पण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आयुष्यात वर्कची व्याख्या नक्की काय आहे? ऑफिसमध्ये सगळ्यांच्या कामाचं स्वरूप आणि जबाबदाऱया सारख्या नसतात. मला माझं आयुष्य कसं जगायचंय हा विचार प्रत्येकाने केलाच पाहिजे.

प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःची अशी काही कौशल्ये असतात. आपल्याकडे असलेला वेळ, आपला दृष्टिकोन, आपली कलाकौशल्ये यांना वर्कमध्ये किती प्रमाणात वापरायचं आणि लाइफमध्ये किती प्रमाणात वापरायचं हे आपल्यालाच ठरवावं लागतं. मुळात बालन्स हा कधीच 50-50 टक्के नसतो. कारण कामाच्या ठिकाणी असणाऱया अपेक्षा आणि वैयक्तिक आयुष्यातल्या अपेक्षा यांचा समतोल साधणं कठीण असतं हे समजून घ्यायला हवं. कारण या दोन्ही गोष्टी आणि त्यासाठी लागणारा वेळ नेहमीच वेगळा असणार.

आज आाफिसचे लॅपटॉप्स, त्याबरोबर ऑफिसच घरात शिरलं आहे. व्हाट्सआपवर ऑफिसचे ग्रुप्स आणि पामिली ग्रुप्स वरखालीच असतात. म्हणजे एकीकडे बायकोला जेवायला वाढू का, याला उत्तर देता देता ऑफिसच्या बासने मागितलेलं पीपीटी तयार झालं का, याला एकाच वेळी उत्तर दिलं जातं. हे इथेच संपत नाही. हे रात्रभर चालूच राहतं. झोपेचं खोबरं होतं, पण त्या बासच्या ई-मेलला उत्तर दिल्यावरच झोप लागते.

खरं तर आपणच आपल्यावर बंधनं ओढवून घेतो.  आपणच ठरवतो की, अमुक एक काम अमुक वेळेतच झालं पाहिजे. खरं तर गरज नसते. जर ते काम तासाभराने पूर्ण झालं तर जग बुडणार नसतं, पण नाही. आपण विनाकारण ताण घेत असतो. समोरचा शांत असतो. वेळच्या वेळी आहार, झोप घेत असतो. त्याची प्रॉडक्टिव्हिटी नक्कीच वरच्या दर्जाची असते. खूप जणांचा गैरसमज असतो की, वर्क लाइफ बालन्स पाळल्याने आयुष्यात आता स्ट्रेस नसणार! मुळात प्रत्येकाच्या आयुष्यात कमी-जास्त प्रमाणात तणाव हा असतोच. आपल्याला तो किती पटकन ओळखून, तो कमी करणं महत्त्वाचं असतं. शेवटी प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते. मी मालिका आणि चित्रपट क्षेत्रात काम करायला लागल्यापासून माझ्या बायको व मुलाबरोबर कधीच सुट्टीसाठी बाहेर जाऊ शकलो नाही. अहो सुट्टीचं सोडा, त्यांच्याबरोबर एखादा सिनेमा बघायला गेलो तर तोही कधी धड एन्जाय करता आला नाही. कारण सतत मेसेज किंवा काल्स… एखादा शॉट सापडत नाही म्हणून कधी संकलन विभागातून किंवा सेटवर सगळं छान नियोजन करूनसुद्धा “अरे हिराइन लवकर जायचं म्हणतेय. तुमच्याशी काही बोलणं झाला होतं का?’’ पर्यंत.

माझे अनेक शनिवार-रविवार एपिसोड वेळेवर जावा म्हणून ऑफिस मध्येच गेले आहेत. त्या काळी वाटायचं माझी आाफिसमध्येच जास्त गरज आहे. घरच्यांना आपण किती गृहीत धरतो नाही का! माझा एक मित्र रात्री दहानंतर फोन बंद करतो आणि झोपी जातो. दुसऱया दिवशी उठल्यावर फोन बंद ठेवल्यामुळे बघू जगात किती नुकसान झालंय असं बोलून  आपल्या कामाला लागतो. कमाल आहे बुवा! काही कठोर निर्णय घेण्यासाठी हिंमत लागते.

एकूण काय, तर कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या कामाला किती वेळ द्यायचा हे आपल्यालाच ठरवावं लागतं. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार ही किती मार्मिक ओळ आहे ना? पण तूच तुझ्या कामाचाही शिल्पकार आहेस हे नाही विसरायचं!

[email protected]

(लेखक fिक्रएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)