कुकचा तिजोरीवर डल्ला, दिल्लीत पोलिसांनी पकडले

मालाड पूर्वेकडे राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरातून 75 लाख किमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोकड असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला होता. परंतु पोलीस तपासात व्यावसायिकाच्या घरात काम करणाऱ्या कुकने हे कांड केल्याचे व तो दिल्लीला पळून गेल्याचे कळताच दिंडोशी पोलिसांनी दिल्लीत गाठून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीचा 72 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

गौरव घुवालेवाला (44) असे त्या व्यावसायिकाचे नाव आहे. मालाड पूर्वेकडील अप्पर गोविंद नगरात ते राहतात. 28 ते 31 मे च्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरातल्या बेडरूममधील कपाटातल्या तिजोरीतील सोने-चांदीचे दागिने व रोकड असा मिळून 75 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे घुवालेवाला यांच्या निदर्शनास येताच त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तेव्हा घुवालेवाला यांच्या घरात कुकचे काम करणारा छोटे बहकु मुखिया (32) हा कुक गायब असल्याचे आढळून आले. तसेच तो दिल्लीत असल्याचे समोर येताच पोलिसांनी दिल्ली गाठून त्याला उचलले. चौकशीत त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 72 लाख 57 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.