
बांगलादेश येथून महिलांना मुंबईत आणत त्यांना वैद्यकीय नोकरीचे आमिष दाखवून कुंटणखान्यात ढकलू पाहण्याचा प्रकार समोर आला आहे. मालवणी पोलिसांनी वेळीच कारवाई करून तीन बांगलादेशी महिलांची सुटका केली. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी मनसार अहमद शेखला अटक केली आहे.
शहरात अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पोलीस कारवाई करत आहेत. मालवणी परिसरात बांगलादेशी महिला राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पोलिसांनी पडताळली. त्यानंतर पोलिसांनी मालवणी येथील एका घरात छापा टाकला. छापा टाकून तीन महिलांची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी त्या बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगितले.
कुटुंबांचे पालनपोषण करण्यासाठी त्या नोकरीच्या शोधात होत्या. आरोपीने त्या महिलांना मुंबईत रुग्णालयात नोकरी देतो अशा भूलथापा मारल्या. गेल्या महिन्यात त्यांना हिंदुस्थान-बांगलादेशची सीमा ओलांडून मुंबईत आणले. विशेष म्हणजे सुटका केलेल्या महिलेचे बनावट आधारकार्डदेखील बनवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून मनसारला अटक केली. त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.