
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा तिथीनुसार उद्या सोमवारी किल्ले रायगडावर पार पडणार आहे. त्यासाठी स्वराज्याच्या राजधानीत हजारो शिवभक्त दाखल झाले असून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवराज शके 352 याप्रमाणे शिवराज्याभिषेक दिनाचे सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सोहळय़ाच्या पूर्वसंध्येला शिरकाई देवीचे पूजन करण्यात आले असून भगव्या तेजाने रायगड किल्ला उजळून निघाला आहे.
तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन सोहळय़ासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त वाजतगाजत, ढोलताशांच्या निनादात राजसदरेवर आले असून लाडक्या राजाला मानाचा मुजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड व कोकणकडा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 8 व 9 जून रोजी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. आज रायगडावरील मुख्य राजसदरेवर शिवतुला करण्यात आली. त्यातील पदार्थ गोरगरीबांना देण्यात येणार आहेत. आज किल्ल्यावर मावळय़ांनी चित्तथरारक कसरतीही केल्या.
दोन हजारांचा पोलीस बंदोबस्त
उद्या सोमवारी नगारखान्यासमोर असलेल्या भव्य ध्वजाचे पूजन व आरोहण करण्यात येईल. त्यानंतर मुख्य सोहळय़ाला प्रारंभ होणार आहे. रायगड पोलीसही छत्रपतींना मानवंदना देणार आहेत. या सोहळय़ानंतर भव्य शोभायात्रा निघणार असून शिवाजी महाराजांची पालखी जगदीश्वर मंदिराकडे प्रस्थान करेल. या शोभायात्रेमध्ये शिवकालीन पोशाख परिधान केलेले असंख्य मावळे सहभागी होणार आहेत. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून दोन हजारांचा फौजफाटा तैनात केला आहे. शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडल्यानंतर संपूर्ण गडावर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे.