
23 मे पासून मेघालयातून एक बेपत्ता झालेले जोडपे चर्चेत होते. राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी गायब झाल्यानंतर, अखेर या प्रकरणाला नवीन कलाटणी मिळाली आहे. पत्नी सोनम रघुवंशी हिला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथून शोधून काढले आहे. 17 दिवसांनंतर पोलिसांना सोनम रघुवंशी गाझीपूरच्या सोनम नंदगंज पोलीस स्टेशन हद्दीतील एका ढाब्यात सापडली.
सध्या पोलिसांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, प्राथमिक उपचार आणि तपासणीनंतर, तिला वन स्टॉप सेंटरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. सोनम रघुवंशी सापडल्यानंतर पोलिसांना आता पुढील तपासाची दिशा मिळणार आहे. सोनम रघुवंशी मेघालयातून गाजीपूरला कशी पोहोचली आणि तिचा पती राजा याचे काय झाले याचा तपास आता पोलिस करत आहेत. राजा रघुवंशी याचा मृतदेह 2 जून रोजी मेघालयातील एका धबधब्याजवळ आढळला होता. राजा रघुवंशी यांच्या कुटुंबाने हॉटेल आणि शिलाँगमधील स्थानिक लोकांवर राजा आणि सोनमसोबत काहीतरी चुकीचे केल्याचा आरोप केला होता. तपासादरम्यान, पोलिसांना राजाचा मृतदेह आणि सोनमचे रक्ताचे डाग असलेले जॅकेट सापडले.
सोनम आणि राजा यांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा मेघालय आणि मध्य प्रदेश पोलिस सतत तपास करत होते. आता मेघालयच्या डीजीपींनी सोनम रघुवंशी हिचा पती राजाच्या हत्येत सहभाग असल्याचा खुलासा केला आहे. तिनेच तिच्या पतीला मारण्याची सुपारी दिली होती. मेघालय पोलिसांनी या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. सोनमने आत्मसमर्पण केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
अलीकडेच सोनम रघुवंशीच्या आईने मुलीचा शोध घेण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ते म्हणाले, “आम्हाला सीबीआय चौकशी लवकरात लवकर सुरू करायची आहे. जेणेकरून माझी मुलगी लवकरात लवकर घरी येऊ शकेल. आम्हाला आशा आहे की, आता काहीतरी उघड होईल पण काहीही उघड होत नाहीये. आमची मुलगी लवकरात लवकर सापडावी अशी आमची इच्छा आहे.”
आईने सांगितले की, कुटुंबातील सदस्य मुलीबद्दल माहिती मिळेल, या आशेने सतत टीव्हीसमोर बसले आहेत, परंतु कोणतीही बातमी मिळत नाही. सोनम रघुवंशी यांना शोधणाऱ्या व्यक्तीला बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.