
अहमदाबादमध्ये गुरूवारी एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर’ विमान कोसळून 290 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमानातील रमेश विश्वास कुमार हा एकमेव प्रवासी बचावला. मृतांमध्ये दोन नवजात बालके, 11 लहान मुले तसेच 169 हिंदुस्थानी, 53 ब्रिटीश, 1 कॅनेडियन, 7 पोर्तुगीज नागरिकांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत विमानातील प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. या विमान अपघातात पायल खाटीक नावाच्या एका मुलीचाही मृत्यू झाला आहे.
मूळ राजस्थानची आणि गुजरातमधील हिम्मतनगर येथे व्यवसाय करणाऱ्या खाटीक कुटुंबाची मुलगी पायल एका खासगी कंपनीत काम करत होती. तिच्या चांगल्या कामामुळे कंपनीने तिला लंडनला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा पायलचा पहिलाच विमान प्रवास होता. पायलचे वडील सुरेशभाई खाटीक हे रिक्षा चालक असून त्यांनी मोठ्या कष्टाने त्यांच्या मुलीला शिक्षण दिले होते. त्यामुळे ती एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागली होती.
पायलचे वडील सुरेशभाई खाटीक यांनी आपल्या मुलीला स्वप्न पाहून ती सत्यात उतरवण्यासाठी तिच्या पंखात बळ दिलं. मात्र नशिबाने तिच्यासाठी काहीतरी वेगळेच ठेवले होते. पायल अहमदाबादहून लंडनला जात असलेल्या विमानाचा भयानक अपघात झाला. पायलच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
टाटा समूहाकडून मृतांच्या कुटुंबीयांना 1 कोटीची मदत
टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखर यांनी पत्रक जारी करत विमान दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून या घटनेने अतीव दुख झाल्याचे म्हटले आहे. अपघाताची नैतिक जबाबदारी स्विकारत टाटाने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकि एक कोटीची मदत जाहिर केली आहे. इतकेच नव्हे तर जखमींचा खर्च टाटा उचलणार असून विमानामुळे कोसळलेले मेडिकल कॉलेजचे वसतीगृहही टाटा बांधून देणार आहे.
भाचीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डॉक्टर पत्नीसोबत निघाले होते लंडनला, वाटेतच काळाने घातला घाला






























































