Israel Iran War : मधे पडाल तर महागात पडेल! इराणचा ट्रम्प यांना सज्जड दम

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष विकोपाला गेला असून दोन्ही देशांनी एकमेकांवर जोरदार हवाई हल्ले केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड तणाव वाढला आहे. अमेरिकेच्या इशाऱयानंतर इराणनेही सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायल-इराण युद्धात जर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने नाक खुपसण्याचा प्रयत्न केला तर तुमच्याही लष्करी तळांवर हल्ले करू, असे बजावतानाच ‘मधे पडाल तर महागात पडेल’, असा सज्जड दमच इराणने ट्रम्प यांना दिला आहे.

शुक्रवारी रात्री इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीववर 100 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात आतापर्यंत 3 लोकांचा मृत्यू झाला असून 41 जखमी झाले आहेत. तसेच इमारतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. इस्रायली हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने हे हल्ले केले आहेत. इराणने इस्रायलमधील लष्करी केंद्र आणि हवाई तळांसह डझनभर ठिकाणांवर हल्ले केले. इराणने या ऑपरेशनला ‘ट्रू प्रॉमिस-3’ असे नाव दिलेय. ऑपरेशनची अधिक माहिती नंतर देऊ, असेही इराणने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

हल्ल्यात 78 जणांचा मृत्यू

  • इराणच्या हल्ल्यामुळे तेल अवीवच्या संपूर्ण शहरात दहशत पसरली आहे. या हल्ल्याआधी इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केले होते. तेहरानच्या दाव्यानुसार, इस्रायली हल्ल्यात 78 लोकांचा मृत्यू आणि 320 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
  • दरम्यान, संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांना तत्काळ युद्ध थांबवण्याची विनंती केली आहे. हे युद्ध असेच सुरू राहिले तर याचा संपूर्ण जगावर परिणाम होईल, असे ते म्हणाले.

इस्रायलचे पंतप्रधान म्हणतात, ही फक्त सुरुवात

इस्रायलचे पंतप्रधान बेंझामीन नेतान्याहू यांनी इराणवर केलेला हल्ला ही फक्त सुरुवात आहे असे म्हटलेय. इराणने जर पुन्हा इस्रायलवर हल्ला केला तर इस्रायल इराणवर यापेक्षा मोठी कारवाई करेल, असे म्हटले. या तणावाने मध्य-पूर्वेमधील युद्धाचा धोका वाढला आहे. खाडी देशांत अमेरिकेच्या फौजा तयार आहेत. तसेच सौदी अरब, कतार, आणि यूएई यांसारख्या देशांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.