माथेरान घाटात सलग दुसऱ्या आठवड्यात ट्रॅफिकजाम, तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

दोन दिवस सलग सुट्ट्या आल्याने राज्याच्या विविध भागांतून असंख्य पर्यटकांनी निसर्गरम्य माथेरानकडे कूच केली खरी पण दस्तुरी नाक्यावर पोहोचताच त्यांची चांगलीच गोची झाली. दस्तुरी नाका येथील पार्किंग फुल्ल झाल्याने माथेरान घाटात तीन किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही पर्यटकांना तर वाहनातून उतरून घाट चढत माथेरान गाठावे लागले.

पावसाळ्यात माथेरानचे निसर्गसौंदर्य काही वेगळेच असते. तेथील हिरवेपणा आणि पाऊसधारा अनुभवण्यासाठी शुक्रवारपासूनच पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. वाहतूककोंडीसह अनेक अडचणींवर मात करत पर्यटक माथेरान घाटात पोहोचले. मात्र वाहनांची भलीमोठी रांग पाहूनच पर्यटकांचा घामटा निघाला. दस्तुरी नाका येथील वाहन पार्किंग सेवा फुल्ल झाली. नियोजनाअभावी पार्किंग लवकरच फुल्ल झाल्याने तीन किलोमीटर अंतरापर्यंत पर्यटकांची वाहने अडकून पडली होती. घाटात झालेल्या वाहतूकोंडीमुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प झाली होती. अनेकांनी वाहनातून उतरत दस्तुरी नाका गाठला. दस्तुरी नाका येथील वाहनतळाची जागा वाढवण्याचे नियोजन प्रशासन करत नसल्याने घाटात वारंवार वाहतूककोंडी होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

झाड कोसळले
माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाड्यांवर झाड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये तीन चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गाड्या दस्तुरी नाक्यावरील वनविभागाच्या जागेत उभ्या असल्याने सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी झाड बाजूला केले.