
40 लाख रुपयांचे बक्षीस रक्कम असलेली ऑरियनप्रो आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर आणि ज्युनियर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा 16 ते 24 जून 2025 दरम्यान वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेद्वारे मुंबई हे जागतिक बुद्धिबळ खेळाचे पेंद्र बनण्याच्या वाटेवर आहे.
अखिल हिंदुस्थानी बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेने इंडियन बुद्धिबळ स्कूलने आयोजित स्पर्धेत अव्वल आणि जागतिक दर्जाच्या खेळाडूंमुळे रोमांचक आणि चुरशीचे सामने अपेक्षित आहेत.
या स्पर्धेत 17 देशांतील 400 हून अधिक खेळाडूंनी त्यांचा सहभाग निश्चित केला आहे. त्यात 16 ग्रॅण्डमास्टर आणि 13 आंतरराष्ट्रीय मास्टर्स आहेत.
एकूण 40 लाख रुपयांचे बक्षीस असलेली ही हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत बुद्धिबळ स्पर्धांपैकी एक आहे. त्यात ग्रॅण्डमास्टर विभागासाठी 25 लाख आणि ज्युनियर (13 वर्षांखालील) विभागासाठी 15 लाख रुपयांचे एकूण बक्षीस असेल. ज्युनियर स्तरावरील ही सर्वाधिक बक्षीस असलेली ही स्पर्धा आहे.
ग्रॅण्डमास्टर विभागात जॉर्जियाचा ग्रॅण्डमास्टर लेवन पँटसुलियाला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी अनुक्रमे आर्मेनियाचा ग्रॅण्डमास्टर पेट्रोस्यान मॅन्युएल आणि जॉर्जियाचा ग्रॅण्डमास्टर लुका पायचाडझे आहे.
ज्युनियर विभागात हिंदुस्थानचा 12 वर्षीय फिडेमास्टर अंश नेरुरकर टॉप सीडेड आहे. त्याच्या पाठोपाठ पुद्दुचेरीचा मधेश कुमार आणि महाराष्ट्राचा अविरत चौहान आहे. याशिवाय श्रीलंकेची 12 वर्षीय महिला इंटरनॅशनल मास्टर ओशिनी गुणवर्धनामुळे स्पर्धेतील रंगत वाढली आहे.