तारापूर एमआयडीसीत आगडोंब, स्फोट यू. के. एरोनॉटिक्स कंपनीला भीषण आग

एमआयडीसमधील यू. के. एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड केमिकल्स या कंपनीमध्ये सहा महिन्यांनंतर आज सकाळी 11 च्या सुमारास पुन्हा आगडोंब उसळला. तसेच कानठळ्या बसण्याएवढे प्रचंड स्फोटही झाले. सुदैवाने ही कंपनी बंद होती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. अन्यथा मोठा अनर्थ ओढावला असता. मात्र या घटनेनंतर तारापूर एमआयडीसीमधील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

यू. के. एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड केमिकल या कंपनीमध्ये परफ्युम, फ्रेगनेंस व सौंदर्य प्रसाधनांसाठी लागणाऱ्या केमिकल्सचे उत्पादन घेतले जाते. सहा महिन्यांपूर्वी याच कंपनीमध्ये मोठी आग लागली होती. या कंपनीला लागलेली भयंकर आग आटोक्यात आणण्यास 10 तास लागले होते. या दुर्घटनेनंतर कंपनी बंद होती. मात्र आज पुन्हा याच कंपनीमध्ये मोठी आग लागली.

भिवंडीत एकाचा मृत्यू
आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान भिवंडीच्या बळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत शनिवारी केमिकलच्या गोदामास लागलेल्या आगीमध्ये सोमनाथ भोजने या 48 वर्षीय इसमाचा रात्री उशिरा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.