
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र ‘सत्तेसाठी भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेणार नाही,’ असे स्पष्ट करत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज या चर्चेला पूर्णविराम दिला.
राज्यात आगामी काळात होणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचा पिंपरी-चिंचवड येथे मेळावा पार पडला. त्यावेळी तुम्ही सगळय़ांना बरोबर घ्या अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. शरद पवार यांनी हाच मुद्दा पकडत सगळे म्हणजे कोण, अशी विचारणा करत, राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी वाटचाल आणि संभाव्य युती कुणाबरोबर असेल किंवा विशेषकरून कुणाबरोबर नसेल यावर थेट भाष्य केलं.
शरद पवार पुढे म्हणाले की, ‘हे सगळे म्हणजे गांधी-नेहरू-चव्हाण यांचा विचार, फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार मानणारे असतील तर मला मान्य आहे. पण सत्तेसाठी भाजपबरोबर जाऊन बसणारे लोक असतील तर ते काँग्रेसचा विचार मानणारे नाहीत. कुणाशीही संबंध ठेवू, पण भाजपशी संबंधित असलेले लोक काँग्रेसच्या विचारांचे असू शकत नाहीत. त्यामुळे अशा संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडत शरद पवार यांनीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर पडदा टाकला.
प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार – अजित पवार
प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेवर अधिक बोलणे टाळले आहे.

































































