अमेरिकेत राहणाऱ्या मराठी दाम्पत्याने मुलाला टाकलं झेडपीच्या शाळेत, मराठी शिकण्यासाठी घेतला निर्णय

मूळचे मराठी असलेले आणि अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका दाम्पत्याने आपल्या सात वर्षांच्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत घातलं आहे. आपल्या मुलाची आणि मराठी भाषेची नाळ तुटू नये म्हणून या दाम्पत्याने हा निर्णय घेतला आहे.

भारती शेळके आणि विजयकुमार शेळके हे महाराष्ट्रातले असून दोघेही कामानिमित्त अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यांना विहान नावाचा सात वर्षांचा मुलगा आहे. विहान अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना भागात एका शाळेत शिकत होता. विहान सुरुवातीला चांगलं मराठी बोलत होता. पण शाळेतले त्याचे सर्व मित्र अमेरिकन असून तो इंग्रजी बोलत होता आणि मराठी भाषा विसरत होता. विहानच्या आईला ही धोक्याची घंटा वाटली. विहान पुढे जाऊन मराठी भाषा संपूर्णपणे विसरून जाईल अशी भिती त्यांना होती. म्हणून शेळके दाम्पत्यांनी आपल्या मुलाला एका जिल्हा परिषदेच्या शाळेत घालण्याचा निर्णय घेतला आहे.

भारती शेळके यांचे भाऊ डॉ. उमेश बालटे हे सांगलीत राहतात. त्यांचाही मुलगा आटपाडीच्या शाळेत शिकतो. त्यामुळे भारती यांनी आपल्या मुलाला आटपाडीच्या जिल्हा परिषद शाळेत पाठवलं आहे. विहान आता आपल्या मामेभावासोबत जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन मराठीचे धडे गिरवणार आहे.

विहान सात वर्षांचा असून भाषा शिकण्याचे हे योग्य वय आहे असे मत विहानच्या आई भारती शेळके यांनी व्यक्त केले आहे. विहानचे वडिल विजयकुमार गेल्या 15 वर्षांपासून अमेरिकेत काम करत आहेत. भारती यांचे लग्न झाल्यानंतर त्याही अमेरिकेत स्थायिक झाल्या. शेळके दाम्पत्याला दोन मुलं असून दुसरा मुलगा दोन वर्षांचा आहे. पुढच्या दीड वर्षात शेळके यांचा व्हिसा संपणार आहे. त्यामुळे या काळात विहान चांगलं मराठी शिकेल अशी आशा भारती यांनी व्यक्त केली आहे.