
हिंदुस्थानच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने फिडे वर्ल्ड रॅपिड अॅण्ड ब्लिट्ज टीम चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या चरणात अव्वल मानांकित चीनच्या होउ यिफानचा पराभव केला. 19 वर्षीय दिव्याच्या या पराक्रमामुळे देशभरात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. नागपूरच्या दिव्या देशमुखने स्पर्धेच्या उपांत्य लढतीत दृढ इच्छाशक्ती आणि प्रतिभेचे कौशल्य दाखविताना तणावपूर्ण अंतिम गेममध्ये 74 चालींत विजयावर शिक्कामोर्तब केले. दिव्याचा मातब्बर होउ यिफानविरुद्धचा हा विजय बुद्धिबळ जगतात सध्या चर्चेचा विजय ठरला आहे. या हिंदुस्थानी खेळाडूने हेक्सामाइंड बुद्धिबळ क्लबचे प्रतिनिधित्व करताना हा विजय मिळविला. दिव्याच्या या विजयासह तिच्या संघाने ब्लिट्जमध्ये कांस्य, तर रॅपिडमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. याचबरोबर दिव्याने वैयक्तिक कांस्यपदकही जिंकले. या स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या दिव्याची ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद ठरली.