
इराणविरुद्धच्या युद्धात आतापर्यंत इस्रायलला छुपी मदत करणारी अमेरिका आता थेट युद्धात उतरली आहे. इराणच्या तीन अणुऊर्जा प्रकल्पांवर सुमारे 14,000 किलोचे 6 बंकर बस्टर बॉम्ब टाकत अमेरिकेने आगीत तेल ओतले. त्यासाठी अमेरिकेची बी-2 फायटर विमाने सलग 37 तास तब्बल 11,102 हजार किलोमीटरचा प्रवास करून इराणमध्ये पोहोचली आणि विध्वंस घडवून आणला. बॉम्ब हल्ल्याबरोबरच अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर 30 टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रेही डागली. त्यामुळे किरणोत्सर्गाचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, इराणनेही काही तासांतच प्रत्युत्तर देत इस्रायलवर 40 क्षेपणास्त्रे डागत दणका दिला. त्याचवेळी येमेनही युद्धात उतरला असून जगात इराण विरोधक आणि समर्थक असे दोन गट पडल्याने अवघ्या जगावर तिसऱया महायुद्धाचे सावट आहे.
इराण-इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने इराणला इशारे देत होते. इस्रायलवरील हल्ले तातडीने थांबवा असेही ट्रम्प यांनी इराणला धमकावले होते. मात्र इराणमधील इस्रायली हल्ले थांबल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असे इराणने ठणकावले होते. इराण बधत नसल्याचे पाहून शुक्रवारी अमेरिकेने इराणला 15 दिवसांची मुदत दिली होती. मात्र त्यानंतर दुसऱयाच दिवशी अमेरिकेने इराणवर बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला. इराणच्या नतान्झ, फोर्डो आणि इसफाहान या अणुप्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले. यापैकी नतांझ प्रकल्पावर इस्रायलने आधीही हल्ल्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेने हल्ला केलेली तिन्ही अणुऊर्जा केंद्रे इराणसाठी अत्यंत महत्त्वाची असून तिथे मोठ्या प्रमाणावर युरेनियमचे साठे असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच अमेरिकेने हे प्रकल्प टार्गेट केले.
आम्ही केलेले हल्ले यशस्वी झाले असून लक्ष्यभेद करून आमची सर्व विमाने सुखरूप परतल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. अमेरिका, इस्रायल आणि जगासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. इराणने आता हे युद्ध थांबवायलाच हवे. त्यांनी प्रतिहल्ला केला तर आम्ही आणखी ताकदीने यात उतरू. आता एकतर शांतता नांदेल किंवा इराणची शोकांतिका होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्पविरोधात अमेरिकेत नाराजी
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात नाराजीचे सूर उमटले आहेत. डेमॉव्रेटिक पक्षाच्या सिनेटर एलिजाबेथ वॉरेन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. ’ट्रम्प परस्पर असे पाऊल कसे उचलू शकतात? देशाची अशी काही भूमिका असेल तर अमेरिकी काँग्रेसच तशी घोषणा करू शकते. ‘हे एक भयंकर युद्ध असून ते थांबवण्यासाठी मतदान घ्यायला हवे,’ असे वॉरेन यांनी म्हटले आहे.
नेत्यनाहू म्हणाले, काँग्रेच्युलेशन्स प्रेसिडेंट ट्रम्प
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांचे अभिनंदन केले. ‘शक्तीतून शांतता यावर आमचाविश्वास आहे. आज ट्रम्प यांनी ही ताकद दाखवून दिली. इराणमधील अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्याचा ट्रम्प यांचा निर्णय धाडसी असून त्यामुळे नवा इतिहास घडेल,’ असे नेतन्याहू म्हणाले.
मुस्लिम देश इराणच्या बाजूने… ट्रम्प यांना नोबेल द्या म्हणणारा पाकिस्तानही विरोधात
अमेरिकेच्या या कृत्याचा जगातील अनेक देशांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. चीन व रशिया या बलाढय़ राष्ट्रांनी अमेरिकेचा निषेध केला आहे. ट्रम्प यांना शांततेचे नोबेल द्या म्हणणाऱया पाकिस्तानसह सर्व मुस्लिम देश अमेरिकेच्या विरोधात एकवटले असून येमेनने इराणच्या बाजूने थेट युद्धात उडी घेतली आहे.
सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार, इराणने ट्रम्प यांना ठणकावले
अमेरिकेने केलेले हल्ले हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे सरळसरळ उल्लंघन आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेची अमेरिका व इस्रायलशी मिलिभगत असल्याचा आरोपही इराणने केला आहे. ‘व्हाईट हाऊस’ आणि तेल अवीवमधील टोळ्यांनी कितीही धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरत नाही. आमचा अणुकार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, युद्धाची सुरुवात तुम्ही केली आहे, त्याचा शेवट आम्ही करू, असेही इराणने ठणकावले आहे. आमचे सर्वोच्च नेते अयातुल्ला कोमेनी यांच्या केसालाही धक्का लागला तर तुमची खैर नाही, असे इराणने खडसावले.
‘खैबर’वार! इस्रायलवर डागली 40 क्षेपणास्त्रे!!
अमेरिकेच्या हल्ल्यामुळे भडकलेल्या इराणने काही तासांतच प्रत्युत्तर दिले. इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीव व हायफासह 10 शहरांवर तब्बल 40 क्षेपणास्त्रे डागली. यात इराणच्या सर्वात अत्याधुनिक अशा खैबर अर्थात खोरमशर-4 या क्षेपणास्त्राचाही समावेश होता. इराणच्या या हल्ल्यात सुमारे 86 लोक जखमी झाले. तसेच यात लष्करी आणि निवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आखाती देशांतील अमेरिकेच्या लष्करी तळांना इराणकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.
मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन
इराण-इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. दोन्ही देशांतील तणावाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. हा तणाव लवकरात लवकर निवळावा व दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून शांततेसाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.
इस्रायलमधून 150 हिंदुस्थानी जॉर्डनमध्ये
इराणविरोधातील युद्ध चिघळल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने 4 बसच्या माध्यमातून सुमारे 150 भारतीयांना जॉर्डनमध्ये हलवले आहे. तिथून त्यांना भारतात पाठवले जाणार आहे. दरम्यान, इराणमधून आज आणखी 311 हिंदुस्थानी मायदेशी परतले.
अणुकेंद्र सुरक्षित
अमेरिकेचा दावा इराणने फेटाळून लावला. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे आमच्या अणुप्रकल्पांना किंचितही धक्का लागलेला नाही. अणुप्रकल्पांतून किरणोत्सार झालेला नाही, असे इराणच्या नॅशनल न्यूक्लियर सेफ्टी सिस्टिम सेंटरने स्पष्ट केले आहे.
येमेनचीही युद्धात उडी
अमेरिकेने इराणमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर येमेनने इराणच्या बाजूने युद्धात उतरण्याची घोषणा केली आहे. आम्ही आता अधिकृतरीत्या युद्धाचा भाग आहोत, असे येमेनने सांगितले.