खासगी वाहनांवर खासदार, आमदाराचे स्टिकर चिटकविणारे मोकाट, कारवाई करण्याची कायद्यात तरतूदच नाही

लोकप्रतिनिधींना त्यांच्या खासगी वाहनांवर खासदार, आमदाराचे अधिकृत स्टिकर लावण्याची परवानगी आहे. परंतु कोणीही आपल्या खासगी गाडीवर खासदार, आमदाराचे स्टिकर लावून रुबाबात फिरताना सर्रास दिसतात. बरेच जण या स्टिकरचा दुरुपयोगदेखील करतात. परंतु असे बेकायदेशीरपणे स्टिकर लावून फिरणाऱयांविरोधात कारवाई करण्याची मोटार वाहन कायद्यात कोणतीही तरतूद नसल्याने दंडात्मक कारवाई होत नसल्याचे वास्तव आहे.

खासदार, आमदारांव्यतिरिक्त पक्षाचे कार्यकर्ते अथवा पदाधिकारी बेकायदेशीरपणे आपल्या खासगी वाहनांवर खासदार, आमदाराचे स्टिकर लावून फिरताना सर्रास दिसतात. त्यामुळे याची दखल घेत लोकप्रतिनिधी वगळता बेकायदेशीरपणे खासगी वाहनांवर स्टिकर चिटकविल्याबाबत किती जणांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली याबाबत सामाजिक कार्यकर्ता संतोष घोलप यांनी राज्याच्या वाहतूक शाखेच्या अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडे माहिती मागितली होती. त्यानुसार खासदार, आमदाराचे स्टिकर खासगी वाहनांवर चिटकविल्याबाबत कारवाई करण्याची मोटर वाहन कायद्यात कोणतीही तरतूद नसल्याने दंडात्मक कारवाई झालेली नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. दरम्यान, कांदिवली येथे राहणारे देवांग दवे हेदेखील त्यांच्या खासगी वाहनावर राजमुद्रा असलेले स्टिकर लावून फिरत असल्याची तक्रार घोलप यांनी मुख्यमंत्री कार्यालय व पोलीस आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत.

n कोणीही अशा प्रकारे आपल्या खासगी वाहनावर खासदार, आमदाराचे स्टिकर लावून फिरल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. अशा वाहनातून अमली पदार्थांची तस्करी, अपहरण, मद्यपान करून गाडी चालविणे आदी प्रकार घडू शकतात. त्यामुळे याबाबत शासनाने गंभीर दखल घेऊन केवळ लोकप्रतिनिधींनाच त्यांच्या वाहनावर स्टिकर चिटकविण्याची मुभा द्यावी, असेही घोलप यांनी सांगितले.