
आपल्यापैकी अनेक घरांमध्ये कांदा हा घरात असतोच. कांद्याशिवाय एखादी भाजी करणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे. आपण सर्वजण विविध पदार्थ आणि भाज्या बनवण्यासाठी कांद्याचा वापर करतो. बहुतेक घरांमध्ये कांदा आणि लसूण हा प्रामुख्याने वापरला जातो. कांदा केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर, शरीराला सुद्धा अनेक फायदे देतो.
कच्चा कांदा खाल्ल्याने शरीर थंड राहते. दररोज कांदा खाल्ल्याने उष्माघाताचा धोका कमी होतो. एवढेच नाही तर कांद्यामध्ये अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-डायबेटिक गुणधर्म देखील आढळतात. म्हणून आहारामध्ये कांद्याचा समावेश करणे हा एक उत्तम आरोग्यदायी पर्याय आहे.
कच्चा कांदा खाण्याचे फायदे
कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी- ६, फोलेट, पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फ्लेव्होनॉइड्स, ग्लूटाथिओन, सेलेनियम सारखे पोषक घटक आढळतात. हे घटक आरोग्याला पुरेसे पोषण देणारे असतात.
कांदा खाल्ल्याने शरीरातील जळजळ कमी होते. कांद्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण हे खूप मुबलक असते. त्यामुळे आपल्या शरीरामधील व्हिटॅमिन सीची कमतरता भरुन निघते.
कच्चा कांदा हा रक्तातील साखरेवर खूप जालिम औषध मानले जाते. मधुमेहींनी कच्चा कांदा खाल्ल्यास, रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते. कांद्यामध्ये सल्फर आणि क्वेर्सेटिनसारखे अँटीऑक्सिडंट्स आढळतात. रक्तातील साखर संतुलित करण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास प्रभावी ठरतात.
दररोज कच्चा कांदा खाणे आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर मानले जाते. मुख्य म्हणजे कांद्यामध्ये मुबलक असलेले फायबरचे प्रमाण, पचनसंस्थेसाठी खूप गरजेचे आहे. कांद्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स, आपल्या आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवतात आणि पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते.
दररोज कांदा खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे कमी होते. कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आढळतात जे शरीराला हानिकारक बॅक्टेरिया आणि विषाणूंपासून वाचवतात.
दररोज कांदा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. याचे कारण कांद्यामध्ये आढळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आहे. ही खनिजे हाडे मजबूत करतात. कांद्यातील व्हिटॅमिन सी आणि सिलिका केसांसाठी प्रभावी ठरतात. चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या आणि मुरुमे कमी करण्यासाठी देखील कांदा फायदेशीर मानला जातो.