आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक विजय गांगुर्डे बडतर्फ, धान्य खरेदी घोटाळ्यात दोषी; 27 कोटींच्या वसुलीचे आदेश

महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. गांगुर्डे यांना धान्य खरेदीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. चौकशीत ते दोषी आढळून आल्यामुळे त्यांच्यावर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 27 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आधारभूत धान्य खरेदी करण्यात येते. गांगुर्डे हे जव्हार येथील प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक असताना आधारभूत धान्य खरेदी हंगाम सन 2022-2023 अंतर्गत शहापूर येथील उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत पळशीण, साकडबाव, न्याहाडी, खांडस व वेहलोळी या आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर धान्य खरेदीत मोठा गैरव्यवहार झाला होता. त्यावेळी सुमारे 86 हजार 634 क्विंटल धान्य व 2 लाख 17 हजार 897 नग बारादानाचा अपहार झाल्याने महामंडळाचे 26 कोटी 51 लाख 130 रुपयांचे नुकसान झाले होते

गांगुर्डेचा खुलासा फेटाळून लावला
दोषारोप खोडून काढण्यासंदर्भात कोणतेही सबळ पुरावे ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे गांगुर्डे यांचा खुलासा दोषारोप फेटाळून लावत त्यांच्यावर चौकशी समितीने लावलेले मान्य करत बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. 27 कोटी 91 लाख 55 हजार 232 रुपयांची वसुली गांगुर्डे यांच्याकडून करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी दिली आहे.