
शाळेत ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या दुर्घटनेत 260 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. मध्य आफ्रिकेची राजधानी बांगुई येथील बार्थेलेमी बोगांडा हायस्कूलमध्ये ही घटना घडली.
शाळेच्या आवारात खराब झालेले इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर पुन्हा सुरू केले जात होते. यावेळी ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आणि ते जीव वाचवण्यासाठी पळू लागले. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि 29 विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये 16 मुलींचा समावेश आहे, असे आफ्रिकन मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
या अपघातात सुमारे 260 विद्यार्थी जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सरकारने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही शाळेत घडलेल्या मोठ्या दुर्घटनांपैकी एक मानली जाते. या घटनेमुळे देशावर शोककळा पसरली आहे.