
‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ असलेल्या लोकल ट्रेनच्या मोटरमनवर दबाव टाकण्याचे सत्र सुरूच आहे. सीसीटीव्ही कॅमेऱयाच्या माध्यमातून मोटरमनवर वॉच ठेवला जात असतानाच आता बायोमेट्रिक हजेरीसाठी दबाव टाकला जात आहे. सकाळी तुमची गाडी कुठूनही सुटू दे, आधी बायोमेट्रिक हजेरीसाठी सीएसएमटी मुख्यालयात या, अशा सूचना मोटरमनला करण्यात येत आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाच्या या नव्या दबावतंत्राविरोधात मोटरमन आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे डय़ुटी असलेले बहुतांश मोटरमन कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर अशा लांबच्या परिसरात राहतात. त्यांना दिवसाच्या सुरुवातीला डय़ुटी सुरू करण्यापूर्वी सीएसएमटी मुख्यालयात येऊन बायोमेट्रिक हजेरी लावण्याच्या सूचना केल्या जात आहेत. मध्य रेल्वेवर सकाळी काही गाडय़ा ठाणे, परळ, दादर स्थानकांतूनही सुटतात. प्रशासनाच्या नव्या धोरणासनुसार, त्या गाडय़ा चालवण्याची डय़ुटी सुरू करण्याआधी हजेरीसाठी मुख्यालयाचा फेरा मारण्याच्या सूचना मोटरमनला केल्या जात आहेत. बदलापूर, कल्याण, टिटवाळा येथून येणाऱया मोटरमनसाठी बायोमेट्रिक हजेरीचे हे नवे धोरण डोकेदुखीचे ठरू लागले आहे. अनेक मोटरमनना डय़ुटीच्या सुरुवातीला दीड-दोन तासांचा प्रवास करून सीएसएमटी गाठावे लागत आहे. त्यानंतर जेथून गाडी चालवायची आहे त्या स्थानकात वेळेवर पोचावे लागत आहे. लोकल अचूक वेळेत स्थानकातून चालवण्याची बांधीलकी आम्ही वर्षानुवर्षे जपली आहे. असे असताना प्रशासन सीएसएमटी मुख्यालयात बायोमेट्रिक हजेरी लावण्याचा दबाव का टाकत आहे, असा संतप्त सवाल मोटरमनकडून केला जात आहे.
… तर मग आम्हाला दक्षिण मुंबईत घरे द्या!
मोटरमनला जर सीएसएमटी येथील मुख्यालयात येऊन बायोमेट्रिक हजेरी लावण्यासाठी सक्ती केली जाणार असेल तर रेल्वे प्रशासनाने आम्हाला दक्षिण मुंबईत रेल्वेच्या वसाहतीत घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी मोटरमनच्या कामगार संघटनांनी केली आहे.
प्रशासनाच्या सक्तीविरुद्ध रेल कामगार सेना आक्रमक
मोटरमनवर वेगवेगळय़ा माध्यमातून दबाव टाकला जात आहे. कारवाईच्या दडपणाखाली मोटरमन वावरत आहेत. त्यात बायोमेट्रिक हजेरीची भर टाकण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने यासाठी सक्ती केल्यास मोटरमन कोणत्याही क्षणी ‘काम बंद’ आंदोलन करतील. त्याचा लोकल सेवेवर परिणाम झाल्यास रेल्वे प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव, रनिंग स्टाफ प्रमुख प्रशांत कमानकर यांनी दिला आहे.