
सर्वात मोठा दरोडा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर दरोडा असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. नागरिकांनी सर्व प्रकारच्या ऑनलाईन डेटाशी संबंधित सर्व पासवर्ड तातडीने बदलून घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे. तसेच बँक खात्यासह विविध ऑनलाईन खात्यांच्या सुरक्षेसाठी मल्टी फॅक्टर ऑथेन्टिकेशन लागू करावे, असेही म्हटले आहे.
डिजिटल अॅरेस्ट, ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा चुना लावण्याचे प्रकार सुरू असताना आता फेसबुक, गुगल, इन्स्टाग्राम, जीमेल, अॅप्पलसह महत्त्वाच्या वेबसाईट्सचे तब्बल 16 अब्ज ऑनलाईन पासवर्ड्स चोरीला गेल्याचे डोक्याला शॉट देणारी माहिती समोर आली आहे. त्यामुळे बँक खात्यांसह इतर ऑनलाईन डेटाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने सर्व ऑनलाईन पासवर्ड बदलून नवीन बनवायला घेण्याचे आवाहन हिंदुस्थानवासियांना केले आहे. त्यासाठी नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वेही जारी केले आहेत.
चोरीला गेलेल्या ऑनलाईन डेटाचा वापर करून सायबर गुन्हे आणि फसवणुकीचे प्रकार सर्रास घडत असून तब्बल 16 अब्ज पासवर्ड चोरीला गेल्यामुळे अब्जावधी रुपयांची फसवणूक होण्याचा धोका आयटी क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला आहे. 30 वेगवेगळ्या स्रोतांच्या माध्यमातून पासवर्ड्सची चोरी करण्यात आली आहे.