हमाली महागली, हमालांच्या सेवाशुल्कात वाढ

पश्चिम रेल्वेवर मेल-एक्सप्रेस थांबणाऱया टर्मिनसबरोबरच उपनगरीय रेल्वे स्थानकांवर हमालांच्या सेवाशुल्कात वाढ करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने हमालांना देय असलेल्या शुल्कात बदल केला आहे. 1 जून पासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत.

पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर पोर्टरेज शुल्कात बदल केला आहे. प्रवासी त्यांच्या सोयीनुसार त्यांचे सामान डोक्यावर किंवा चारचाकी गाडीवर सेवकाच्या मदतीने वाहून नेण्याचा पर्याय निवडू शकतात, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी दिली. सुधारित दरानुसार डोक्यावरून सामान नेण्यासाठी हमालाला प्रति युनिट 50 रुपये जादा द्यावे लागणार आहेत. हेड लोड सेवांसाठीचे शुल्क रेल्वे स्थानकांच्या श्रेणीनुसार वेगवेगळे असेल. मुंबई सेंट्रल, सुरत, अहमदाबाद, वांद्रे टर्मिनस, वापी, वडोदरा, इंदूर, रतलाम, साबरमती, राजकोट, उज्जैन व गांधीधाम या स्थानकांसाठी प्रति युनिट 100 रुपये शुल्क लागू असेल. त्याचप्रमाणे सर्व उपनगरीय स्थानकांवर शुल्क 100 रुपये राहील. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातून मध्य रेल्वेच्या दादर स्थानकापर्यंत सामान वाहून नेण्यासाठी 100 रुपये हमाली सेवा शुल्क द्यावे लागेल. तसेच प्रवासी प्रति प्रवास 150 रुपये दराने 160 किलोपर्यंतचे सामान वाहून नेण्यासाठी व्हील बॅरो सेवा घेऊ शकतात.

आजारी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष दर

पश्चिम रेल्वे प्रशासनाने आजारी आणि दिव्यांग व्यक्तींना नेण्यासाठी विशेष दर लागू केले आहेत. दोन व्यक्तींना व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरवर नेण्यासाठी 150 रुपये शुल्क लागू राहील, तर चार व्यक्तींना नेण्यासाठी 200 रुपये सेवा शुल्क द्यावे लागणार आहे.