मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी साकीब नाचन याचा मृत्यू, दिल्लीत उपचार घेत असतानाच पापाचा घडा भरला

मुंबईत 2002-03 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी आणि सिमी, इसिस या दहशतवादी संघटनांचा म्होरक्या साकीब नाचन याचा मृत्यू झाला. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना ब्रेन स्ट्रोक आल्याने त्याला उपचारासाठी दिल्लीतील दीनदयाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार घेत असतानाच त्याच्या पापाचा घडा भरला. त्याच्या मृत्यूचे वृत्त त्याच्या मूळ गावी भिवंडी येथील पडघा-बोरिवली गावात थडकताच या गावाभोवती पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघानजीकच्या बोरिवली गावातील साकीब नाचन हा स्टुडंट इस्मामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेचा महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी होता. त्यानंतर तो या संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष बनला. जनरल सेक्रेटरी म्हणूनही तो काम करत होता. या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर तो पाकिस्तानच्या आयएसआय या दहशतवादी संघटनेशी संपर्कात आला. 1990 च्या दशकात खलिस्तानी दहशतवाद्यांसोबतचे साकीब नाचनचे कनेक्शन उघड झाले. त्यानंतर तो तपास यंत्रणांच्या रडारवर आला होता. त्यानंतर सीबीआयने त्याला अटक केली होती. दहशतवाद आणि खुनाच्या आरोपाखाली त्याच्यावर किमान 11 खटले चालले. गुजरातमधील दहशतवादी कनेक्शन प्रकरणात तो दोषी ठरल्याने गुजरातच्या टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. भिवंडीत गोरक्षकांचे वकील ललित जैन यांची 2002 मध्ये हत्या करण्यात आली. त्यातही साकीब आरोपी होता.

2002 आणि 2003 या दोन्ही वर्षी मुंबईतील मुंबई सेंट्रल, विलेपार्ले आणि मुलूंड येथील साखळी बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग सिद्ध झाला होता. त्यामुळे त्याला दहा वर्ष कारावासाची शिक्षा झाली होती. ती भोगून तो पुन्हा पडघ्यातील बोरिवली गावात आला होता. सिरीयातील दहशतवादी संघटना इसीसशी त्याचे कनेक्शन होते. इसीसचे मोड्युलर त्याने पडघा, पुणे आणि संभाजीनगरात उभे केले होते. याप्रकरणी एनआयएने 2023 मध्ये त्याला पुन्हा अटक केली होती. तो तिहारच्या तुरुंगात शिक्षा भोगत असतानाच त्याला ब्रेन स्ट्रोक आला.

बोरिवली गाव त्याने ‘अल शाम’ म्हणून घोषित केला

साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगून आल्यानंतर बोरिवली गावात राहणाऱ्या साकीबने हे गाव ‘अल शाम’ म्हणून घोषित केले. हे गाव स्वतंत्र इस्लामिक राज्य असल्याची घोषणा केल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या छाप्यातून समोर आले होते. त्यासाठी साकीबने वेगळे कायदेही बनवले होते. एनआयएच्या छाप्यात बेहिशेबी रोकड, बंदूक, धारदार शस्त्रे, गुह्याची कागदपत्रे, स्मार्ट फोन आणि डिजिटल उपकरणे जप्त केली होती. साकीब स्वतःला ‘खलिफा’ म्हणजेच अल्लाचा उत्तराधिकारी समजत होता.