
राष्ट्रीय खो-खोमध्ये आजही फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या खेळाडूंचा दबदबा असला तरी हिंदुस्थानी खो-खो महासंघावर उत्तरेच्या संघटकांनीच आपले वर्चस्व कायम राखले आहे. खो-खो महासंघाच्या 2025 ते 2029 या कार्यकालासाठी झालेल्या बिनविरोध निवडणुकीत दिल्लीच्या सुधांशु मित्तल यांनी आपले अध्यक्षपद पुन्हा एकदा कायम राखले आहे, तर पंजाबच्या उपकार सिंह विर्क यांची सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे. दोन्ही महत्त्वाची पदे उत्तरेच्या राज्यांनी मिळाली असली तरी महासंघाच्या तिजोरीची किल्ली महाराष्ट्राच्या ऍड. गोविंद शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र खो-खो संघटनेचे खजिनदार असलेले ऍड. गोविंद शर्मा आता खो-खो महासंघाच्या खजिनदारपदाचीही जबाबदारी सांभाळतील. तसेच महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या उपाध्यक्षा अश्विनी पाटील यांचीही सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन कार्यकालानंतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा महासंघाचे खजिनदारपद मिळाले असून महेश मेढेकर यांच्यानंतर ही जबाबदारी पुन्हा महाराष्ट्राच्या वाटय़ाला आली आहे.
ऍड. शर्मा हे महाराष्ट्र खो-खो संघटनेचे माजी सचिव, खो-खो महासंघाचे कार्यकारी सदस्य असून त्यांनी 2016 मध्ये महासंघाच्या पुरस्कार समिती सदस्य, खेलो इंडिया स्पर्धेचे विभागीय सदस्य, नेपाळविरुद्ध झालेल्या कसोटीतील प्रशिक्षक, आशियाई स्पर्धेतील तांत्रिक अधिकारी, तसेच गुवाहाटी (2023) स्पर्धेतील निवड समिती सदस्य अशा अनेक भूमिका यशस्वीरीत्या निभावल्या आहेत. 2016 पासून ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड समिती सदस्य म्हणून सातत्याने कार्यरत आहेत.
बिनविरोध निवड झालेले पदाधिकारी व सदस्य
अध्यक्ष ः सुधांशु मित्तल (दिल्ली)
उपाध्यक्ष ः भवर सिंह पलारा (राजस्थान),
कल्याण चटर्जी (प. बंगाल), कमलजीत अरोरा (छत्तीसगड), लोकेश्वर (कर्नाटक), एम. मधुसूदन सिंह (मणिपूर), एम. सीता रामी रेड्डी (आंध्र प्रदेश), प्रद्युम्न मिश्रा (ओडिशा), राजीब प्रकाश बरुआ (आसाम). सरचिटणीस ः उपकार सिंह विर्क (पंजाब). खजिनदार ः गोविंद शर्मा (महाराष्ट्र ) सहसचिव ः ए. नेल्सन सॅम्युएल (तामीळनाडू), एल.आर.वर्मा (हिमालय प्रदेश, संजय यादव (मध्य प्रदेश), सुनील नाईक (गोवा). कार्यकारी सदस्य ः अमरीन्द्र पाल सिंह (जम्मू आणि कामीर), अनुप चक्रवर्ती (सिक्कीम), बिजन कुमार दास (प. बंगाल) गुरचंद सिंह (पंजाब), बिजन कुमार दास (प. बंगाल), एम.व्ही.एस.एस. प्रसाद (आंध्र प्रदेश),नीरज कुमार (बिहार),एन. कृष्णमूर्ती (तेलंगणा), प्रमोद कुमार पांडये(दादरा ऍण्ड नगर हवेली), पुटो बुई (अरुणाचल प्रदेश),रजत शर्मा (उत्तरांचल), संजीव शर्मा (चंदिगड), संतोष प्रसाद (झारखंड), सूर्यप्रकाश खत्री (दिल्ली), ऍथलीट कमिशन ः मोनिका, अश्विनी पाटील (महाराष्ट्र).