
हिमाचल प्रदेशात सध्याच्या घडीला मुसळधार पाऊस कोसळत आहे. पाऊस आणि ढगफुटीच्या घटनांमुळे राज्यात अनेक ठिकाणी विदारक दृश्य दिसत आहे. मंडीमध्ये सर्वात वाईट परिस्थिती पाहायला मिळत आहे. मंडीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्यामुळे हाहाकार माजला आहे. मुसळधार पावसाने चांगलेच थैमान घातले असून, पांडोह धरणातून 1 लाख 50 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. चिंताजनक बाब म्हणजे हवामान खात्याने आजही अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये देखील बंद आहेत.
सोमवारी संध्याकाळी हवामान खात्याने कांगडा, मंडी आणि सिरमौर जिल्ह्यांच्या काही भागात पुढील 24 तासांत मध्यम स्वरूपाच्या पुराचा धोका असल्याचा इशारा दिला होता. बुधवारी हवामान खात्याने हिमाचल प्रदेशातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आणि 6 जुलैपर्यंत डोंगराळ राज्यात पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान खात्याने कांगडा, मंडी आणि सिरमौर जिल्ह्यांच्या काही भागात पुढील 24 तासांत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. अलकनंदा नदीमध्ये 15 फूट उंच शिवमूर्ती पाण्याखाली गेली असून, कुठे भूस्खलन तर कुठे ढगफुटी सुरु आहे.
मंडीच्या कारसोग आणि धरमपूरमध्ये ढगफुटीनंतर सात लोक बेपत्ता आहेत, रस्ते, पूल वाहून गेले आहेत. ढगफुटीमुळे आणि अचानक आलेल्या पुरामुळे एकाचा मृत्यू झाला आहे, तर 7 जण बेपत्ता आहेत. यामध्ये एकूण 8 घरांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत 39 लोकांना वाचवण्यात आले आहे. मंडीच्या गोहर आणि कारसोग भागात एनडीआरएफच्या टीम रवाना झाल्या आहेत.