पोलिसांच्या जाचाला कंटाळून नालासोपाऱ्यातील बिल्डरची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये दोन पेलिसांची नावे

पोलिसांच्या जाचाला कंटाळून नालासोपाऱ्यातील एका बिल्डरने आत्महत्या केल्याची घटना आज घडली. जयप्रकाश चौहान असे या बिल्डरचे नाव आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून शाम शिंदे आणि राजेश महाजन या दोन पोलिसांची नावे लिहून हेच माझ्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असे नमूद केले आहे. या घटनेमुळे नालासोपाऱ्यात खळबळ उडाली आहे.

नालासोपारा पूर्व येथील संयुक्तनगर येथे जयप्रकाश चौहान याने ओम श्री दर्शन ही इमारत पुनर्विकासासाठी घेतली होती. त्या बांधकामासाठी पोलीस शिपाई शाम शिंदे याने त्याच्या नातलगाच्या माध्यमातून 50 लाखांचे फायनान्स केले होते. एका वर्षात दुप्पट रक्कम देण्याच्या आश्वासनावर त्याने हे पैसे दिले. तसेच जामीन म्हणून चार फ्लॅटचा ताबाही दिला.

इमारत बांधकामास एक वर्षाहून अधिक काळ झाल्याने पोलीस शिपाई शाम शिंदे आणि त्याचा सहकारी राजेश महाजन तसेच मध्यस्थ लाला लजपत यांनी जयप्रकाश चौहानकडे पैशांच्या मागणीचा तगादा लावला. जयप्रकाश यांनी 22 लाख ऑनलाइन आणि 10 लाख रुपये रोख असे 32 लाख शाम शिंदेला दिल्याचे नातेवाईक आणि मित्रांना सांगितले. मात्र तरीही शाम शिंदे आणि त्याचा सहकारी जयप्रकाश यांना पैशासाठी त्रास देत होते.

z ती बिल्डिंग आता आमची आहे, तू सोडून जा, अन्यथा खोटय़ा गुह्यात अडकवू अशी धमकी शाम शिंदे याने दिल्याचा दावा चौहान कुटुंबीयाने केला आहे. शाम शिंदेच्या त्रासाला कंटाळून जयप्रकाश चौहान यांनी मुलाच्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आपण पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केले आहे. जयप्रकाश चौहान यांच्या मुलीने तिच्या वडिलांच्या आत्महत्येला शाम शिंदे आणि राजेश महाजन हेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.