लाडका कंत्राटदार! रस्ते कामात विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवरचा कोट्यवधी रुपयांचा दंड माफ

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या थाटात मुंबई खड्डेमुक्त करू अशी घोषणा केली होती. पण ही घोषणा राहिली बाजूला. पालिकेने रस्त्यांच्या कामात विलंब झाला म्हणून कंत्राटदारांवर कोट्यवधी रुपयांचा दंड लावला होता. पण सरकारने हा दंड आता माफ केला आहे. सर्वाधिक दंड हा ईगल इन्फ्रास्टक्चरला लावण्यात आला होता. ईगल इन्फ्रास्टक्चरला 17 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुंबई खड्डेमुक्त होणार अशी घोषणा केली होती. त्यानुसार पालिकेने दोन भागात मुंबईचे 700 किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार होते आणि यासाठी 17 हजार 733 कोटी रुपये खर्च होणार होता. या प्रकल्पाच्या एका टप्प्यात 320 किमीचे रस्ते तर दुसऱ्या टप्प्यात 378 किमीचे रस्ते दुरुस्त होणार होते. या कामांसाठी नऊ कंपन्यांना कंत्राट देण्यात आले होते. पहिल्या टप्प्यासाठी चार तर दुसरऱ्या टप्प्यासाठी पाच कंपन्यांकडे हे कंत्राट देण्यात आले होते.

मार्च 2023 मध्ये हे कंत्राट देण्यात आले होते. तर पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये या कामांना सुरूवात झाली. या संपूर्ण कामात अनेक ठिकाणी विलंब झाला. त्यामुळे पालिकेने या कंत्राटदारावर आर्थिक दंड लावला. 2023 ते मे 2025 दरम्यान पालिकेने या कंत्राटदारांवर 38.93 कोटी रुपये दंड लावण्यात आला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामांना 33.71 कोटी रुपये तर दुसऱ्या टप्प्यासाठी 5.22 कोटी रुपये दंड लावण्यात आला होता. यात सर्वाधिक दंड हा ईगल इन्फ्रा इंडिया कंपनीला म्हणजेत 17 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर म्हणाले की कामात झालेली दिरंगाई, टेंडरमधील अटी न पाळणे, निकृष्ट दर्जाचं काम यांसारख्या कारणांमुळे आम्ही कंत्राटदारांवार दंड ठोठावला आहे. जिथे चूक सापडली असेल तिथे दंड आकारण्यात आला आहे. पण पहिल्या टप्प्यातील खुप सारा दंड माफ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्याचे कामच ऑक्टोबर 2024 मध्ये सुरु झाल्याने या टप्प्यातला दंड कमी आहे.

बांगर यांनी पुढे सांगितलं, निकृष्ट दर्जाचे कामाकडे बिल्कूल दुर्लक्ष केले जाणार नाही. तसेच जिथे कामाचा दर्जा चांगला नसेल तिथे दंड ठोठावला जाईल आणि कठोर कारवाई करण्यात येईल असेही बांगर म्हणाले.

सध्या मुंबईतल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं पावसामुळे थांबवली आहेत. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही कामं पुन्हा सुरू होतील. असे असले तरी आतापर्यंत मुंबईतल्या 700 किमीच्या रस्त्यांपैकी एकूण 49 टक्के काम झाले आहे. पहिल्या टप्प्यातील 63 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील 36 टक्के काम पूर्ण झाले आहे.