बीडीडीप्रमाणे बीआयटी चाळींचा पुनर्विकास करा, प्रदूषित माहूलमध्ये पाठवलेल्या रहिवाशांना माझगावमध्ये निवारा द्या! मनोज जामसुतकर यांची मागणी

माझगाव-ताडवाडी बीआयटी चाळींचा बीडीडीप्रमाणे पुनर्विकास  करा. प्रदूषित माहुलमध्ये स्थलांतरित केलेल्या 220 रहिवाशांना तातडीने मूळ माझगाव विभागात स्थलांतरित करण्याची मागणी शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.

भायखळा विधानसभा मतदारसंघात माझगाव ताडवाडी बीआयटी चाळींचा परिसर आहे. सुमारे 100 वर्षे जुन्या इमारती आहेत. या इमारतींचा पुनर्विकास होण्यासाठी बारा ते सोळा क्रमांकाच्या पाच इमारतींमधील रहिवासी संक्रमण शिबिरात गेले आहेत. त्यातील 220 लोकांना माहुलमध्ये नेले आहे. नऊ वर्षांपासून हे रहिवासी माहुलमध्ये राहात आहेत. त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात प्रदूषण आहे, तर बाकीच्या तीन इमारतींमधील रहिवाशांसाठी माझगावमध्येच संक्रमण शिबीर बांधले आहे. त्यामुळे या रहिवाशांना पुन्हा माझगावमध्ये आणावे. माझगाव ताडवाडी पुनर्विकासाचे काम हे बीडीडी चाळी, अभ्युदय नगरच्या धर्तीवर विशिष्ट धोरण राबवून पुनर्विकास करण्याची मागणी जामसुतकर यांनी केली.

नागपूरच्या हिवाळी आणि मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशात मी मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात बैठक बोलावण्याची मागणी केली होती, पण अजूनही बैठक आयोजित केली नाही. गेल्या सहा महिन्यांत यासंदर्भात दोनवेळा मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे. पण अजूनही वेळ दिलेला नाही. शासनाने यामध्ये लक्ष घालून माझगाव ताडवाडीतील रहिवाशांना न्याय द्यावा अशी मागणी मनोज जामसुतकर यांनी केली.