चार वर्षांत 379 पोलिसांचा मृत्यू; 25 पोलिसांनी केली आत्महत्या, सुनील शिंदे यांनी केली चौकशीची मागणी

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील पोलीस दलावर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यात आर्थिक संकटे, संसारिक प्रश्न अशा अनेक गोष्टी आहेत. यामुळेच गेल्या चार वर्षांत 379 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यातील 25 पोलीस अधिकारी-अंमलदारांनी आत्महत्या केली आहे. या सर्व मृत्यूंची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत केली.

पोलिसांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत किंवा मुंबई विद्यापीठातील समाजशास्त्र विभागातील प्राध्यापकांमार्फत चौकशी करावी. त्याचबरोबर पोलिसांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत, याची माहिती द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, या पोलिसांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी कोणताही संशय व्यक्त न केल्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्यात आली नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात दिली.

विनाअट नोकरीत सामावून घ्या!

कर्तव्यावर असताना ज्या पोलिसांचा मृत्यू झाला आहे किंवा ज्यांनी आत्महत्या केली आहे, अशा पोलिसांच्या वारसाला विनाअट पोलीस खात्यांत सामावून घ्यावे, पोलिसांना नव्या गृहनिर्माण धोरणानुसार माफक दरात घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शिंदे यांनी केली. दरम्यान, अनुपंपा तत्त्वावर अशा पोलिसांच्या मुलांना सामावून घेतले जाते, असे कदम यांनी सांगितले.

आरोग्य शिबिरांचे आयोजन 

मुंबई पोलीस दलातील पोलिसांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वैद्यकीय शिबिरे, आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येतात. त्याचबरोबर मान्यवर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून समुपदेशन करण्यात येते. 40 प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. टाटा आणि ए. के. मेहता या रुग्णालयांबरोबर पॅन्सर पॅम्प आयोजित करण्यात आले. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांवर रुग्णालयात मोफत उपचार दिले जात आहेत, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली.