पाऊस थांबताच रोहा नगर परिषद ‘इन अ‍ॅक्शन’; साफसफाई, धुरीकरण जोरात

रोहा शहरासह जिल्ह्याला गेला आठवडाभर पावसाने चांगलेच झोडपले होते, मात्र सध्या पावसाने उसंत घेताच नगर परिषद ‘इन अ‍ॅक्शन’ झाली असून साफसफाईच्या कामाला वेग आला आहे. रस्त्यावरील कचरा उचलतानाच नाल्यांची सफाई आणि धूरफवारणी केली जात आहे.

नगरपालिका प्रशासनाने या कामासाठी अधिक मनुष्यबळ आणि संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. अतिवृष्टीमुळे कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. पुराचे पाणी अष्टमी येथील कोळीवाड्यात शिरल्याने येथील नाल्यांमध्ये लाकडी ओडके, प्लास्टिक, कपडे अडकून पाणी नागरी वस्तीत घुसले. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी नाल्यांची सफाई करून प्रवाह सुस्थितीत केला. वैकुंठभूमी, बाजारपेठ, विठ्ठल मंदिर परिसर, शाळा, छत्रपती शिवाजी नगर तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर टीसीएल पावडर फवारणी करण्यात आली. डास आणि इतर किडींसाठी प्रतिबंधात्मक औषध व धूर फवारणी करण्यात आली. एकंदरीत पावसाने उसंत घेतल्यावर स्वच्छतेच्या कामाला वेग आल्याने रोह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. घरातून निघणारा कचरा अयोग्य ठिकाणी टाकू नये, नाल्यांमध्ये कचरा टाकू नये आणि परिसरात स्वच्छता राखावी. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. – अजयकुमार एडके, मुख्याधिकारी तथा प्रशासक, रोहा नगरपालिका