
अहमदपूर तालुक्यातील मौजे हडोळती येथील वयोवृद्ध शेतकरी आंबादास पवार यांनी खर्च परवडत नाही म्हणून स्वतः औताला जुंपून घेऊन पत्नी मुक्ताबाई पवार यांच्या सोबत शेती मशागत केली. दैनिक सामना ने हे वृत्त सर्व प्रथम प्रकाशित करताच राज्यात खळबळ उडाली. या शेतकरी दाम्पत्यास अनेकांनी मदतीची आश्वासने दिलेली आहेत. प्रत्यक्षात आजपर्यंत त्यांना एक लाख 40 हजार रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने मात्र एक पोते खत, दहा किलोचे एक बकेट आणि तुरीचे बी एवढी मदत देण्यात आली आहे. अनेक जण भेटून फोटोसेशन करून सहानुभूती व्यक्त करून जात असल्याचे दिसून येत आहे.
अहमदपूर तालुक्यातील मौजे हाडोळती येथील वयोवृद्ध शेतकरी दाम्पत्य अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नी मुक्ताबाई पवार यांची जगण्याची धडपड दैनिक सामनाने सर्वांसमोर आणली. शेतीतील मशागतीचे काम करण्यासाठी पैसे नसल्याने अंबादास पवार यांनी स्वतः अवताला जुंपून घेतले घेतले. या दाम्पत्याचे व्हिडीओ फोटो पाहून अनेकांचे हृदय पिळवटून निघाले. अनेकांनी अनेक आश्वासने दिली आहेत. प्रत्यक्षात या कुटुंबास मदत दिली ती हैदराबाद येथील राधू आरीकपुडी सेवा ट्रस्ट्र यांनी. हडोळती येथे येऊन 1 लाख रुपयांचा धनादेश दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार त्यांचे नातलग दिग्विजय पाटील यांनी सहकारी सोसायटीचे कर्ज भरण्यासाठी रोख 40 हजार व शेतकरी दाम्पत्यांच्या कुटुंबातील मुलांचा शिक्षणाचा खर्च व या शेतकरी दाम्पत्याचा वैद्यकीय खर्च करण्याचे आश्वासन दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त नितिन देसाई यांनी 10 हजार रू. बॅक खात्यात जमा केले आहेत. सोशल मीडियावरील पोस्ट पाहून जानवळ येथील रहीवाशी सध्या मुंबई येथे वास्तवयास असलेले माजी. कर्नल विलास डांगे यांनी 10 हजार रुपयांची मदत केली. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर थेट कृषी अधिकाऱ्यांना भेटीसाठी पाठवून दिले. कृषी विभागाने एक पोते खत, एक 10 लिटरचे बकेट आणि तुरीचे बियाणे देऊन बोळवण केली.
हडोळती पासून काही अंतरावर असलेल्या शिरूर ताजबंद येथील मंत्री महोदय बाबासाहेब पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत मदतीचे आश्वासन दिले. बुलढाणा येथील आ. संजय गायकवाड यांनी फोनद्वारे संपर्क साधून या शेतकरी दाम्पत्याला बैल जोडी व आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. अभिनेता सोनू सुद यांनी सोशल मीडियावर मदत करणार असल्याची पोस्ट वायरल होत असली तरी, अद्याप शेतकरी दाम्पत्याचा संपर्क होऊ शकला नाही. सध्या हाडोळती येथे या शेतकरी दाम्पत्याला भेटण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. अनेक जण मदतीची आश्वासने देऊन फोटोसेशन करून जात आहेत.



























































