
>> चैताली कानिटकर
कसोल या सुंदर गावातून सुरू होणारा सार पास ट्रेक हा सर्वात लोकप्रिय ट्रेकपैकी एक आहे. 13,850 फूट उंचीवर असलेल्या या ट्रेकमध्ये पांढरेशुभ्र, पारदर्शक धबधबे, हिरव्यागार दऱ्या आणि वाहणारी पार्वती नदी यांचा सुरेख संगम अगदी मे आणि जून महिन्यांतसुद्धा आम्ही अनुभवला.
निसर्गप्रेमी आणि साहसी, उत्साही ट्रेकर्ससाठी सार पास एक स्वर्गच आहे. सार पास ट्रेकची सुरुवात कसोल या हिमाचल प्रदेशमधील एक प्रसिद्ध पर्वती खोऱयातून होते. पाच दिवस, सहा रात्रींच्या 48 किमीच्या या मध्यम स्वरूपाच्या ट्रेकमध्ये कसोल – ग्रहण-मिन थॅच-नगारू-बिस्केरी थॅच-सार पास-बार्शेनी- कसोल अशा कॅम्प साईट, लोभसवाणी गावं आपलं मन आकर्षित करतात. कसोलला पोहोचण्यासाठी विमानाने भुंतर विमानतळ, तर रेल्वेने जोगिंदर नगर रेल्वे स्टेशनला पोहोचावं लागतं. आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. या वेळेस कस्टमाझज ट्रेक करायचं ठरवलं होतं आणि ट्रेक लीडर होते गोपालकृष्णन. त्यांच्यासोबत आम्ही कसोलला पोहोचलो. ऑक्सिजन लेव्हल, अक्लमटायझेशन वॉक ट्रेक ब्रीफिंग झालं. दुसऱयाच दिवशी ट्रेकला चालायला सुरुवात केली तीच मुळी सफरचंदाच्या बागा, पाईनची जंगलं आणि पार्वती नदीकाठच्या परिसरातून. 4-5 तासांच्या ट्रेकिंगनंतर आम्ही विलक्षण आणि रंगीबेरंगी ग्रहण नावाच्या गावात पोहोचलो होतो. तिथल्या मनमिळाऊ स्थानिकांनी प्रचंड थंडीतही अप्रतिम नाश्ता, जेवणाची सोय केली होती. सूप, पकोडे, पक्वान्न शाही टुकडय़ाचा आस्वाद घेत त्यांचे राहणीमान, जीवनमान जाणून घेता आले. मोठ्ठी बांबूची परडी पाठीवर घेऊन मनमुराद फोटोही काढले. चक्क झाडावरून सफरचंद तोडण्याचा आनंद येथे घेता आला. सर्व झाल्यावर ट्रेक लीडरने सूचना केल्या की, पुढील दिवसाची चढाई कठीण आहे.
ट्रेकचा दुसरा दिवस ग्रहण गावापासून दरीच्या उंचावर असलेल्या एका तीव्र चढाईने सुरू झाला. रोडोडेंड्रॉन, ओक आणि देवदार वृक्षांच्या घनदाट जंगलांमधून, जैवविविधतेने नटलेल्या वनातून आम्ही चढाई करत होतो. सुमारे पाच तासांच्या ट्रेकिंगनंतर मुंग थाच कॅम्पसाईटवर पोहोचलो. सपाट कुरण असलेल्या या जागेवरून बर्फाच्छादित शिखरांचे आणि खोल दरीचे विहंगम दृश्य दिसतं. इथल्या कडाक्याच्या थंडीत आम्हाला लोभस सूर्यास्ताचे, तारांकित रात्रीचे दर्शन घडले. ट्रेकचा तिसरा दिवस सर्वात जास्त आव्हानात्मक ठरला. या दिवशी सार पास ट्रेकच्या सर्वोच्च बिंदूवर म्हणजेच नगारू कॅम्पसाईटवर आम्ही पोहोचलो. उंच आणि निसरडे उतार, खडकाळ भूभाग आणि अरुंद कडे यांतून वाट काढत केलेला हा ट्रेक म्हणजे आपल्या सहनशक्तीची आणि कौशल्याची परीक्षाच. सुमारे सहा तासांच्या ट्रेकिंगनंतर आम्ही नागरू कॅम्पसाईटवर पोहोचलो, जी तिसरी कॅम्पसाईट होती. नागरू कॅम्पसाईट म्हणजे एका बाजूला भव्य पर्वत आणि दुसऱया बाजूला दरी. इथून सार खिंडीचे विहंगम दर्शन घडते. ट्रेकचा चौथा दिवस सर्वात रोमांचक आणि संस्मरणीय ठरला कारण सार पास टॉपवर ट्रेक करायला भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत चढाई करावी लागते. सकाळी अक्षरश आदल्या रात्रीच्या बाटलीतील पाण्याचा बर्फ झाला होता. इतकी गोठवणारी थंडी होती. पूर्ण बर्फातून चढाई करत आम्ही समीटला पोहोचलो. उंच आणि बर्फाळ उतारांमधून ट्रेक करून, सावधगिरी बाळगत आणि ट्रेक लीडरच्या सूचना पाळत पुढे पुढे जात होतो. काही बर्फाळ उतारांवरून खाली जाताना आम्ही आइस स्लाइडदेखील अनुभवल्या, ज्यामुळे जबरदस्त थ्रिलिंग अनुभव घेता आला. सुमारे चार तासांच्या ट्रेकिंगनंतर सार पास टॉपवर पोहोचलो. 13,850 फूट उंचीवर असलेल्या सार पास ट्रेकचा सर्वोच्च बिंदू. सार पास टॉप ही एक अरुंद खिंड आहे, जी पार्वती व्हॅलीला तोश व्हॅलीशी जोडते. येथून दऱया आणि आजूबाजूच्या शिखरांचे दिसणारं दृश्य अवर्णनीय आहे. सार पास टॉपवर भारतीय ध्वज फडकवताना आणि काही फोटो काढताना आमचा ऊर अभिमानानं फुलून येत होता.
सार पास टॉपवर काही वेळ घालवल्यानंतर पुन्हा बिस्केरी थाच कॅम्पसाईटवर उतरलो व रात्री कॅम्पिंग केले. बिस्केरी थाच कॅम्पसाईट ही जागा आतापर्यंत पाहिलेल्या बर्फाच्छादित लँडस्केपपेक्षा अगदी वेगळी होती. ट्रेकचा पाचवा, शेवटचा दिवस सोपा आणि आरामदायी आहे. कारण बिस्केरी थाच कॅम्पसाईटपासून बारशैनी गावापर्यंत उतार आहे. पाईन जंगले, धबधबे, पहाडी गावांमधून ट्रेक करत हिमाचल प्रदेशच्या ग्रामीण जीवनाची झलक आम्ही अनुभवली. तोश गाव, कलगा गाव, पुलगा गाव आणि मणिकरण साहिबसारख्या काही प्रसिद्ध आकर्षणांनादेखील भेट दिली. सुमारे चार तासांच्या ट्रेकिंगनंतर बारशैनी गावात पोहोचलो, जे सार पास ट्रेकचे शेवटचे ठिकाण आहे. बारशैनी गाव हे एक लहान आणि उत्साही गाव आहे, जे पार्वती नदी आणि तोश नदीच्या संगमावर वसलेले आहे. बारशैनी गावातून कसोलला टॅक्सीने आलो. प्रचंड थंडीने, उन्हात बर्फात चालून चेहरे काळवंडले खरे, पण या रोमांचक, निसर्गरम्य ट्रेकने भलताच फ्रेशनेस आणि फिटनेस दिला. सार पास हा चित्तथरारक ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचा आनंद आजही मनात तसाच आहे .