
शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून दिवसातून आठ-आठ तास वीजपुरवठा बंद राहत आहे. महावितरणच्या या गलथान कारभाराविरोधात संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी यावेळी दिला.
नागोठणे पत्रकार संघाने नागोठणेकरांना भेडसावणाऱ्या वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बाळासाहेब ठाकरे सचिवालयातील ग्रामपंचायत सभागृहात चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात लाईटमन नसणे, जीर्ण तारा, धोकादायक पोल, स्मार्टमीटर, भरमसाठ बिले, वेळेवर बिल येत नाही, महावितरण कर्मचारी वाढवणे यावर सखोलचर्चा करण्यात आली. नागरिकांनी प्रश्नांचा महावितरणचे पाली येथील कार्यकारी उपअभियंता बालाजी छात्रे आणि नागोठणे सहाय्यक अभियंता सत्येंद्र सिंग यांनी नागरिकांना समाधानकारक उत्तरे देऊन सर्व समस्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच अखलाक पानसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अध्यक्ष उदय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव महेंद्र माने, सहसचिव मनोहर सपकाळ, प्रसिद्धीप्रमुख रोशन पत्की, सदस्य नारायण म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली.
पनवेलच्या कामोठेमध्ये विजेचा लपंडाव
पनवेल – कामोठे शहर आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्री अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हा विजेचा लपंडाव थांबला नाही तर महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. कामोठे शहरात सध्या वीजपुरवठा दिवसातून दोन ते तीनवेळा खंडित होत आहे. रात्री वीज जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख रामदास गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी सिडकोच्या कार्यालयावर धडक देऊन कार्यकारी अभियंता सिडको प्रकाश पारधी यांना घेराव घातला. याप्रसंगी उपशहरप्रमुख सचिन त्रिमुखे, गणेश खांडगे, शहर संघटक संतोष गोळे, महिला आघाडीच्या संगीता राऊत, मीना सदरे, दीक्षा लवंगरे, स्मिता लँगरी आदी उपस्थित होते.