
निकृष्ट कामांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. मात्र चौकच्या बाजारपेठेत चक्क वीस बाय वीस फूट रुंदीचा अजस्त्र खड्डा पडला असून पावसाचे पाणी त्यात तुंबून हा संपूर्ण मार्गच ‘बुडाला’ आहे. त्यामुळे बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अक्षरशः गुडघाभर पाण्यातून वाट काढत पायपीट करावी लागत आहे.
खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून चौक बाजारपेठची ओळख असून या बाजारपेठमधील रस्त्याला खड्याचे ग्रहण लागले आहे. रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने वाहनचालक व प्रवासी हैराण झाले आहेत. याबाबत अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कानाडोळा केला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
पनवेल महानगर व खोपोली शहर यांच्या मध्यवर्ती वसलेल्या चौक येथे सर्वात मोठी ग्रामीण भागातील बाजारपेठ भरत असल्याने या ठिकाणी नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. तसेच याच बाजारपेठेमधून अन्य गावांना जोडणारा मुख्य रस्ता असल्याने या ठिकाणाहून हजारो वाहने ये-जा करत असतात. मात्र सध्या या बाजारपेठेतील मुख्य रस्त्याला खड्यांचे ग्रहण लागल्याने सर्वजण हैराण झाले आहेत. पाऊस पडताच रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त होत असते, त्यामुळे डबक्यातून पुढील मार्ग शोधणे सर्वांना कठीण बनले आहे. प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेत ल वकरात लवकर रस्ता खड्डेमुक्त करावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
अपघाताची भीती
खड्डे चुकवताना वाहनचालक आडव्या-तिडव्या गाड्या चालवून मार्ग काढतात. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यावेळी अनेकदा दुचाकीस्वार आणि कारचालक खड्ड्यांतूनही बेदरकारपणे गाड्या चालवत असल्याने डबक्यातील पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडते. यातून रोजच वाद होत आहेत. चौक बाजारपेठेतील हा रस्ता महत्त्वाचा असल्याने लवकरात लवकर दुरुस्त करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अन्यथा नागरिकांच्या संतापाचा स्फोट होईल असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या लीना बडेकर यांनी दिला.