
मुंबई उच्च न्यायालयाने या वर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यास परवानगी दिली असल्याने गणेशमूर्ती शाळांमध्ये भव्य मूर्ती साकारण्यात येत आहेत. मात्र पालिकेला हमीपत्र देताना शाडूची मूर्ती आणि नैसर्गिक जलस्रोतात नाही तर कृत्रिम तलावात करण्याची हमी मंडळांना द्यावी लागणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाआधीच बाप्पाच्या ‘पीओपी’ मूर्तीच्या विसर्जनाचे विघ्न उभे ठाकले असून मंडळे संभ्रमात आहेत.
मुंबईत सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर सवादोन लाख घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. बारा हजार सार्वजनिक मंडळांपैकी सुमारे तीन हजार मंडळे रस्त्याच्या बाजूला किंवा मोकळ्या जागेत मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात. यासाठी पालिकेकडून मंडळांना रीतसर परवानगी घ्यावी लागते. यासाठी पालिकेकडून ऑनलाइन आणि वॉर्ड कार्यालयात ऑफलाइन अर्ज सादर करून परवानगी मिळण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मात्र पालिकेच्या हमीपत्राच्या सक्तीमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे जाचक अटींचे हमीपत्र रद्द करा, अशी मागणी केली जाते.
हमीपत्रात काय…
- हमीपत्रानुसार मंडळांना पर्यावरणपूरकच मूर्ती घ्याव्या लागतील.
- हमीपत्रानुसार मंडळांना मंडप उभारणीसाठी वर्षातून एकदाच परवानगी मिळेल.
- मूर्ती रंगवण्यासाठी नैसर्गिक किंवा पर्यावरणपूरक रंग वापरावेत.
- मूर्तीसाठी सदर परवानगीचा वापर करणार नाही.
- मंडपात आगप्रतिबंधात्क यंत्रणा सज्ज राहील.
- विद्युत उपकरणे बसवताना प्रतिथयश व्यावसायिकांकडून सुरक्षेची काळजी घेऊ.
- मंडपाचे पक्के बांधकाम केल्यास पालिकेकडून कारवाई केली जाईल.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा पर्याय शक्य होणार नाही. कारण मोठमोठ्या मंडळांच्या मूर्ती उत्तुंग असतात. शिवाय विसर्जनासाठी होणारी लाखोंची गर्दी पाहता कृत्रिम तलावात विसर्जन करणे धोक्याचे आहे, असे गणेशोत्सव समिती अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले.
उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे आम्ही पीओपीच्या मूर्ती बनवत आहोत. या मूर्तींसाठी मोठी मागणी आहे. यातच गणेशोत्सव अवघ्या 50 दिवासांवर आल्यामुळे विसर्जनाच्या प्रश्नाबाबत सरकारने योग्य निर्णय तातडीने घेतला पाहिजे, असे, डिलाईल रोड येथील मूर्तिकार राजन झाड यांनी सांगितले.