सांगलीत इमारतींच्या पार्किंगची होणार तपासणी, बंद वाहने रस्त्यावर लावली तर कारवाई – आयुक्त गांधी  

महापालिका क्षेत्रातील अनेक इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे खासगी व व्यावसायिक इमारतीची तपासणी करण्यात येणार आहे. नियमानुसार पार्किंग नसेल तर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांनी दिला आहे. तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी बंद पडलेली वाहने लावण्यात आली आहेत. त्या वाहनमालकांवर कारवाई होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

आयुक्त गांधी म्हणाले, महापालिका क्षेत्रात हॉकर्स व नो-हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले आहेत. आता पार्किंगच्या समस्येवर प्रशासन काम करणार आहे. मनपा क्षेत्रातील इमारतींना बांधकाम परवाना देताना नकाशात दाखवण्यात आलेले पार्किंग प्रत्यक्षात आहे की नाही, तसेच या जागेचा पार्किंगसाठी वापर होतो की अन्य कारणांसाठी? याची शहानिशा करण्यात येईल. नियमानुसार वापर होत नसलेल्या इमारतींवर व संबधीत जागामालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आनंद चित्रमंदिरच्या बाजूला असलेल्या पालिकेच्या भूखंडावर पार्किंगसाठी बहुमजली इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. ही इमारत नऊ मजली आहे. सध्या दोनच मजले बांधण्यात येणार असून, त्यात 160 पेक्षा जास्त वाहनांचे पार्किंग होणार आहे. शहरातील पालिकांच्या अन्य जागांवरही पार्किंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अनेक वाहने बंद अवस्थेत असून, ती रस्त्यावरच उभी केली जात असल्याचे आढळून आले आहे. या वाहनांमुळेही अपघात होत आहेत. अशा वाहनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. महापालिकेने शाळा इमारत दुरुस्तीसाठी तीन कोटींचा निधी मंजूर केला आहे. केंद्र सरकारच्या ‘निपुण भारत योजने’अंतर्गत पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे मराठी, गणित, इंग्रजीसह सर्व विषयांत विद्यार्थी निपुण होतील. येत्या वर्षभरात पालिकेच्या शाळांमध्ये व शैक्षणिक दर्जात आमूलाग्र बदल झालेला असेल, असा विश्वास आयुक्त सत्यम गांधी यांनी व्यक्त केला.