
उदयपूरमधील कन्हैया लाल याच्या हत्येवर आधारित ‘उदयपूर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळेच आता ११ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या याचिकेबाबत जोपर्यंत अंतरिम दिलासा देण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करु नये असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. जमीयत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष अरशद मदानी यांनी आणि इतर याचिकाकर्त्यांनी चित्रपटाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळेच आता चित्रपटावर बंदी घालण्याचे उच्च न्यायालयाने ठरवले. तसेच आता यावर केंद्र सरकारने तोडगा काढावा असं न्यायालयाने म्हटलं आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर, चित्रपट निर्माते अमित जानी यांचे निवेदन आले आहे. त्यांनी या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. अमित जानी एएनआयला म्हणाले, “आम्ही हा चित्रपट त्यांचे वकील कपिल सिब्बल यांना दाखवला. चित्रपट पाहिल्यानंतरही या चित्रपटाला मात्र वकीलांनी विरोध दर्शविला आहे.
आज न्यायालयाने म्हटले आहे की, या चित्रपटावर बंदी आहे. आम्ही या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जात आहोत. त्यांना केंद्र सरकारकडे जाण्यास सांगण्यात आले आहे आणि सरकार हा चित्रपट बरोबर आहे की चूक यावर सात दिवसांत निर्णय देईल.” चित्रपटासंदर्भात ते पुढे म्हणाले, “कन्हैया लालची तीन वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. परंतु या झालेल्या हत्येबद्दल अजूनही कोणता निर्णय मात्र घेण्यात आलेला नाही.
केंद्र सरकार आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) या विषयावर निर्णय घेईपर्यंत ‘उदयपूर फाइल्स’ या चित्रपटावरील बंदी कायम राहील. चित्रपटाविरुद्ध जमियत उलेमा-ए-हिंदने अर्ज दाखल केला आहे. जमियत उलेमा-ए-हिंद आणि प्रशांत टंडन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या याचिकेत त्यांनी चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याच्या सीबीएफसीच्या निर्णयाला आव्हान दिले होते. याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेत असा युक्तिवाद केला की, चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे वातावरण बिघडण्याचा धोका संभवतो.
उदयपूरमध्ये शिंपीकाम करणाऱ्या कन्हैयालालची हत्या जून 2022 मध्ये अतिशय निर्घृण पद्धतीने करण्यात आली होती. नुपूर शर्माने मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचं कन्हैयालाल यांनी समर्थन करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. याच वादामुळे कन्हैयालालची हत्या झाली होती.