कॅनडात रथयात्रेच्या मिरवणुकीवर अंडी फेकली, हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने घेतली गंभीर दखल

कॅनडाची राजधानी टोरंटो येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रा मिरवणुकीवर अंडी फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. रथयात्रेत सहभागी झालेल्या संगना बजाज यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे.

संगना बजाज या टोरंटोमध्ये मेकअप आर्टिस्ट आहेत. कॅनडातील हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांनी नुकतीच रथयात्रा काढली होती. मोठय़ा संख्येने भाविक यात सहभागी झाले होते. रथयात्रा मार्गक्रमण करत असताना शेजारच्या इमारतींमधून कोणीतरी अंडी फेकली. बजाज यांनी याचा व्हिडीओ शूट करून तो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यात फुटलेली अंडी रस्त्यावर विखुरलेली दिसत आहेत. ‘वांशिक द्वेषातून हे कृत्य करण्यात आले असावे. या गोष्टीचे आम्हाला खूप वाईट वाटले. पण, आम्ही रथयात्रा थांबवली नाही,’ असे त्या म्हणाल्या.

हे कृत्य सामाजिक सौहार्द बिघडवणारे

रथयात्रेच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने देखील यांची गंभीर दखल घेतली. ‘अशी घृणास्पद कृत्ये अत्यंत खेदजनक आणि सामाजिक सौहार्द वाढवण्याच्या उत्सवाच्या हेतूला बाधा आणणारी आहेत. या प्रकरणी आम्ही कॅनडाच्या अधिकाऱयांशी चर्चा केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे’, असे परराष्ट्र खात्याचे प्रवत्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.