मंगलम् कापूर कंपनी पेटली; कापरासारखी 30 कामगार बचावले

कापूर उत्पादन करणाऱ्या मंगलम् ऑर्गेनिक्स कंपनीतील जुन्या प्लांटमध्ये बुधवारी रात्री भीषण आगडोंब उसळला. कापूर तयार करणारी ही कंपनी अक्षरशः कापरासारखी पेटली. यावेळी कंपनीत 30 कामगार काम करीत होते. मात्र आगीचे लोळ दिसल्यानंतर हे कामगार कंपनीच्या बाहेर पळाले आणि बालबाल बचावले. कंपनीकडे स्वतःची अग्निशमन यंत्रणा आहे. मात्र बंब नादुरुस्त असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले.

खालापूर तालुक्यातील कुंभिवली ग्रामपंचायत हद्दीत कापूर उत्पादन करणारी मंगलम् ऑर्गेनिक्स ही केमिकल कंपनी आहे. या कंपनीतील जुन्या प्लांटमधील फिल्टरजवळ शॉर्टसर्किट झाल्याने बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागली. कापूर आणि इतर पेट्रोल जन्य पदार्थांमुळे क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. त्यावेळी कंपनीतील फायर गाडी आग विझविण्यासाठी बोलवण्यात आली. मात्र फायर गाडी बंद पडल्यामुळे आग भडकली. आगीची माहिती मिळताच खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी खोपोलीनगरपालिकेच्या अग्निशमन दलाची वाहने बोलविली.

कंपन्यांचे अग्निशमन दलही मदतीला

अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले, परंतु आगीची तीव्रता पाहून आलाना कंपनी, पेण नगर परिषद, कर्जत नगर परिषद, पातळगंगा एमआयडीसी, गोदरेज कंपनीतील अग्निशमन बंब बोलावण्यात आले. खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरीक्षक सचिन पवार आणि मंडळ अधिकारी संदेश पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आग विझविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. हेल्प फाऊंडेशनच्या मेंबर्सनी आग विझविण्यासाठी मदत केली आहे.

उरणमध्ये लिथियमच्या कंटेनरला गळती उरणमधील कोप्रोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या ग्लोबिकॉन गोदामात लिथियमने भरलेल्या कंटेनरला अचानक गळती लागली. काही क्षणातच कंटेनरने पेट घेतला आणि सर्वत्र धुराचे लोट उठले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरातील नागरिकांना खोकला, मळमळ तसेच उलट्यांचा प्रचंड त्रास झाला. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना तर श्वास घेणेही अवघड झाले होते.