Honey trap case – गिरीश महाजनांच्या ‘या’ फोटोची CBI मार्फत चौकशी करा; संजय राऊत यांचे ट्विट बॉम्ब

हनी ट्रॅपसह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा असलेल्या प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. लोढा हा मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली. आता याच लोढाचा गिरीश महाजन यांच्यासोबतचा फोटो शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला असून फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

राज्यातीलवरिष्ठ अधिकारी, मंत्र हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे म्हणत काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित केला होता. मात्र ना हनी, ना ट्रॅप असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आता भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा विश्वासू कार्यकर्ता प्रफुल्ल लोढा याच्यावर हनी ट्रॅपचा आरोप करून एकनाथ खडसे यांनी खळबळ उडवली. मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर आता संजय राऊत यांनीही गिरीश महाजन यांचा एक फोटो ट्विट केला आहे.

सोमवारी सकाळी संजय राऊत यांनी एक्स (आधीचे ट्विटर) वर गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा याचा एक फोटो शेअर केला आहे. यात लोढा गिरीश महाजन यांचा पेढा भरवताना दिसत आहे. या फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करा अशी मागणी राऊत यांनी केली.

गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅपचा आरोप, एकनाथ खडसे यांच्या दाव्याने खळबळ

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेतही दिशाभूल करतात. महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले. या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या! दूध का दूध पानी का पानी होईल! 4 मंत्री, अनेक अधिकारी अडकले आहेत! शिवसेनेतून फुटलेले 4 तरुण खासदार (तेव्हा ) याच ट्रॅपमुळे पळाले”, असा खळबळजनक दावाही राऊत यांनी केला.