
शेतकऱ्यांना सरकारनेच कर्जबाजारी करून त्यांचे बळी घेतले, आता कंत्राटदारांवरही आत्महत्येची वेळ आणली, अशा शब्दांत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला आहे.
महायुती सरकारच्या रोजगार देण्याच्या खोटय़ा आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली. पण स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करू पाहणाऱया युवकांच्या स्वप्नांवर सरकारने पाणी फेरले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला.
आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते, आता या सरकारने कंत्राटदारांनाही आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मोठय़ा कंत्राटदारांसाठी रेड कार्पेट आणि लहान कंत्राटदारांची बिलं थकवली जात आहे, हा सरकारचा न्याय आहे का? निवडक लाडक्या कंत्राटदारांना प्राधान्य दिल्यानेच लहान कंत्राटदारांवर ही वेळ आली का? असा सवाल वडेट्टीवार त्यांनी केला आहे. हर्षल पाटील यांची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक दुःखद घटना नाही, तो एक इशारा आहे. राज्य शासन, प्रशासन आणि समाजाने ही गोष्ट गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले केले.


























































