रेल्वे तिकिटांचा वाढता काळाबाजार, बोगस एजंटचा सुळसुळाट; तीन महिन्यांत 75 जणांना अटक, पश्चिम रेल्वेवर आरपीएफ अॅक्शन मोडवर

लोकल ट्रेन व मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांचा काळाबाजार वाढला आहे. अनेक बोगस एजंट रेल्वे स्थानक परिसरातच बेकायदा तिकिटांची विक्री करीत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी आरपीएफ अॅक्शन मोडवर असून पश्चिम रेल्वेवर मागील तीन महिन्यांत तब्बल 75 जणांना अटक करण्यात आली आहे.

रेल्वेचा कर्मचारी वा अधिकृत एजंट नसताना तिकिटांची बेकायदेशीर विक्री तसेच आयआरसीटीसी संकेतस्थळावर बोगस अकाऊंट उघडून रेल्वे तिकिटांची खरेदी करणे या गुह्यांचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल ते जून या कालावधीत अशा प्रकारच्या 68 गुह्यांचा उलगडा केला आणि 75 जणांना अटक केली. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे कायद्याच्या विविध कलमांतर्गत कारवाई तीव्र केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बल सेवा मुंबई विभागाचे सुरक्षा आयुक्त रजत कुंडगीर यांनी दिली.

रेल्वेच्या मालमत्तेवर अतिक्रमणाची डोकेदुखी

रेल्वेच्या मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्या 2816 जणांवर आरपीएफने एप्रिल ते जूनदरम्यान कारवाई केली. त्यांच्याकडून 7 लाख 14 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षी या तीन महिन्यांत 2058 जणांवर कारवाई करून 5 लाख 82 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता.

दिव्यांग, महिलांच्या डब्यात घुसखोरी

लोकलमधील महिला आणि दिव्यांगांच्या राखीव डब्यांमध्ये इतर प्रवासी घुसखोरी करीत आहेत. आरपीएफने तीन महिन्यांत महिलांच्या डब्यातून 1740 आणि दिव्यांगांच्या डब्यातून 2800 घुसखोरांना बाहेर काढले. त्यांच्याकडून अनुक्रमे 4,42,800 व 6,10,200 रुपयांचा दंड वसूल केला.