
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर लादलेल्या 25 टक्के टॅरिफच्या मुद्दय़ावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी दोनवेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
बिहारमधील मतदार याद्यांचा मुद्दाही गाजला
बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीच्या मुद्दय़ावरूनही संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेत कामकाज सुरुवातीला बारा त्यानंतर दोन, चार आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेतही गोंधळाची मालिका कायम राहिली. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही. दुपारी बारा नंतर कामकाज दुपारी दोन आणि चार नंतर साडेचारपर्यंत तहकूब करण्यात आले.
सरकार म्हणते, ट्रेड डील करताना तडजोड नाही!
कुठल्याही देशासोबत व्यापारी करार करताना हिंदुस्थानच्या आर्थिक हितांशी तडजोड केली जाणार नाही. राष्ट्रहिताचे पूर्ण संरक्षण केले जाईल, असे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत स्पष्ट केले. हिंदुस्थानशी ट्रेड डीलची चर्चा सुरू असताना ट्रम्प दबाव आणत आहेत. टॅरिफच्या घोषणेनंतर त्यांनी हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेचा मृत असा उल्लेख केला. त्या पार्श्वभूमीवर गोयल बोलत होते. हिंदुस्थान लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, असा दावा त्यांनी केला.
लोकसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी टॅरिफच्या मुद्दय़ावर उत्तर दिले. मात्र, या उत्तराने समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. लोकसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. गोयल यांच्या उत्तरानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. परंतु, विरोधकांनी हंगामा सुरू केला आणि लोकसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना आपल्या जागेवर जाण्याची विनंती केली. तुम्हाला शून्य प्रहरात आपले म्हणणे मांडायचे आहे का? असा सवाल करतानाच जर तुम्हाला म्हणणे मांडायचे असेल तर जागेवर जाऊन बसा आणि हंगामाच करायचा असेल तर सभागृहाच्या बाहेर जा असे सांगितले. मात्र, विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी सायंकाळी चार वाजून आठ मिनिटांनी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. राज्यसभेत कामकाज तीनवेळा तहकूब झाल्यानंतर अखेर पावणेपाच वाजण्याच्या सुमारास कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
इंडिया आघाडीची भरपावसात निदर्शने
इंडिया आघाडीच्या वतीने बिहारमधील मतदार याद्यांची फेरतपासणीची प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी संसद परिसरात भरपावसात तीव्र निदर्शने करण्यात आली. सलग आठ दिवसांपासून हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात काँग्रेस खासदार सोनिया गांधी, प्रियंका वढेरा, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांचे खासदार मोठय़ा संख्येने सहभागी झाले.




























































