ट्रम्प सत्यच बोलले! मोदींनी अदानीसाठी देश रसातळाला नेला, राहुल गांधी यांचा हल्ला

‘डोनाल्ड ट्रम्प अगदी बरोबर आणि सत्य बोलले आहेत. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था मेली आहे हे वास्तव आहे. पंतप्रधान आणि अर्थमंत्री सोडून सर्वांना हे माहीत आहे. अदानी या एका माणसासाठी नरेंद्र मोदींनी संपूर्ण देश रसातळाला नेला आहे,’ असा घणाघात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. संसदेच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते.

‘देशाच्या समोर आज काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. सरकारने आर्थिक धोरण उद्ध्वस्त केले आहे. संरक्षण धोरण उद्ध्वस्त केले आहे. परराष्ट्र धोरण उद्ध्वस्त केले आहे. मोदी सरकार देशाला रसातळाला घेऊन चालले आहेत. मीडिया ते सांगत नाहीत, मीडियाला भलतेच विषय हवे असतात. पंतप्रधान मोदी हे अदानी या एकाच माणसासाठी काम करतात. सगळेच्या सगळे छोटे उद्योग मोदी सरकारने संपवून टाकलेत, असे राहुल गांधी म्हणाले.

‘हिंदुस्थान-अमेरिकेची ट्रेड डील नक्की होणार. डोनाल्ड ट्रम्प यांना हवी आहे तशीच होणार आणि मोदी तेच करणार, जे ट्रम्प सांगणार. तुम्ही बघाच!’

तुम्ही नेमके कसले यश मिळवलेय?

परराष्ट्र धोरणावरूनही राहुल यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. ‘परराष्ट्र मंत्री सांगतात की आमच्याकडे जबरदस्त परराष्ट्र धोरण आहे. एकीकडे अमेरिका शिव्या घालतेय. चीन तुमच्या मागे लागलाय. तिसरीकडे तुम्ही संपूर्ण जगात तुम्ही शिष्टमंडळं पाठवूनही एकही देश पाकिस्तानचा निषेध करत नाही. हे लोक देश कसा चालवतायत? यांना चालवायलाच येत नाहीये. टोटल कन्फ्युजन आहे. संसदेत बोलताना मोदींनी ट्रम्पचे नाव घेतले नाही. चीनचे घेतले नाही. कोणत्या देशाने पाकिस्तानचा निषेध केला हेही सांगितले नाही. पहलगामचा मास्टरमाइंड मुनीरसोबत ट्रम्प डिनर घेतात, तरी हे म्हणतात आम्ही यश मिळवले. कसले यश मिळवले तुम्ही?’ असा रोकडा सवाल राहुल गांधी यांनी केला.