
तुमच्या घरातील कुंड्यांमधील किंवा बागेतील झाडे सुकू लागली असतील, पाने सुकली असतील किंवा पूर्वीसारखी हिरवी राहिली नसतील, तर घाबरून जाण्याची गरज नाही. काही घरगुती आणि नैसर्गिक गोष्टींनी तुम्ही झाडांना जीवनदान देऊ शकता.

केळीच्या सालींमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम सारख्या पोषक घटकांचे प्रमाण जास्त असते. यामुळे वनस्पतींची मुळे मजबूत होतात आणि नवीन पानांच्या वाढीस मदत होते. केळीची साले लहान तुकडे करून मातीत गाडून टाका किंवा पाण्यात भिजवा. हे पाणी 2-3 दिवसांनी झाडांमध्ये ओता.

चहाची पावडर देखील झाडांसाठी खतापेक्षा कमी नाही. चहा करुन उरलेली चहापावडर जमिनीतील किंवा कुंडीतील मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ आणि सौम्य आम्ल घटक प्रदान करतात. विशेषतः फुलांच्या रोपांसाठी चहाची पावडर ही खूप फायदेशीर मानली जाते. चहा करुन उरलेली चहापावडर ही चांगली धुवून घ्यावी. त्यानंतर ती सुकवावी. ही चहापावडर सुकल्यानंतर, थेट मातीत मिसळा किंवा खतामध्ये मिसळा.

अंड्याचे टरफल हे सुद्धा झाडांसाठी फार महत्त्वाचे मानले जाते. अंड्याच्या टरफलामध्ये, कॅल्शियमचे प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात असते. यामुळे झाडांना मजबूती प्राप्त होते. तसेच अंड्याची टरफले झाडात घातल्याने, झाडांची वाढ जोमाने होते.
भाज्यांच्या सालींमध्ये अनेक प्रकारची खनिजे आणि तंतू असतात. यामुळे माती सुपीक होण्यास मदत होते.तसेच या सालींचे कंपोस्ट बनवून किंवा कुंडीच्या मातीत कमी थोडा खड्डा करुन घालावेत.
तांदूळ धुतल्यानंतर आपण ते पाणी ओतून टाकतो. परंतु हे पाणी झाडांच्या वाढीसाठी फार महत्त्वाचे मानले जाते. म्हणूनच तांदूळ धुतलेले पाणी कधीच फेकून देऊ नये. तांदळाच्या पाण्यात स्टार्च आणि काही महत्त्वाची खनिजे ही मुबलक प्रमाणात असतात. यामुळे झाडांना योग्य ते पोषणही मिळते.






























































