रत्नागिरीत 50 लाखाचं शौचालय! सहा महिन्याची मुदत संपून दीड वर्ष काम रखडतयं

मुंबईतील दीड कोटीच्या शौचालयाची कहाणी संपूर्ण महाराष्ट्राने ऐकली.रत्नागिरीतही तब्बल 48 लाख 13 हजार रूपये निधीचे शौचालय बांधले जात आहे. रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे या या आकांक्षित शौचालयाची उभारणी करण्यात येत आहे. या शौचालयाची  कहाणी वेगळीच आहे. हे शौचालय बांधण्यासाठी सहा महिन्याची मुदत होती. मात्र कार्यारंभ आदेश मिळल्यानंतर दीड वर्ष होऊन गेले तरी या आकांक्षित शौचालयाचे काम पूर्ण झालेले नाही.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत रत्नागिरी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आठवडा बाजार येथे आकांक्षित सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम निश्चित झाले. या कामासाठी 48 लाख 13 हजार 700 रूपयांचे हे काम आहे. या कामाची निविदा प्रक्रिया 2 डिसेंबर 2023 ते 5 डिसेंबर 2023 या काळात झाली. आठवडा बाजारातील आकांक्षित शौचालय उभारण्यासाठी 180 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. 20 डिसेंबर 2023 रोजी आकांक्षित शौचालयाचा कार्यारंभ आदेश मिळाला.आठवडा बाजार येथे पूर्वी जुने सार्वजनिक शौचालय होते ते पाडून आकांक्षित शौचालय बांधण्याचे काम सुरू झाले. नगरपरिषदेने दिलेला 180 दिवसांचा कालावधी संपून दीड वर्ष झाले तरीही आठवडा बाजारातील शौचालयाचे काम पूर्ण झालेले नाही.दिलेल्या वेळेत शौचालयाचे काम पूर्ण न झाल्याने रत्नागिरी नगरपरिषद त्याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे आकांक्षित शौचालय

आकांक्षित शौचालय म्हणजे उच्च दर्जाचे, सुव्यवस्थित आणि वैशिष्ट्यपूर्ण सार्वजनिक शौचालय होय. शौचालय हे स्वच्छ, सुलभ आणि वापरण्यास चांगले असते.हि शौचालय उभारताना चांगल्या दर्जाचे साहित्य वापरले जाते.सामान्य शौचालयांपेक्षा आधुनिक सुविधांचा  समावेश असतो. ज्यामध्ये बहुतेकदा स्पर्शरहित उपकरणे , वेगवेगळ्या वापरकर्ता गटांसाठी म्हणजे अपंग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग लहान मुले आणि महिलांसाठी स्वतंत्र विभाग उभारण्यात येतो.