
मंत्र्यांची बेशिस्त वर्तणूक खपवून घेणार नाही. कारवाई होणार, असे सर्व मंत्र्यांना सांगण्यात आले आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे वादग्रस्त मंत्र्यांना घरी पाठविण्याचे संकेत दिले.
महायुती सरकारमधील काही मंत्री त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि वागणुकीमुळे चर्चेत आहेत. त्यांना फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना चांगलीच समज दिली. बेशिस्त वर्तणूक कराल तर खपवून घेणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई होईल, असे सगळ्यांना आम्ही तिघांनी सांगितले आहे. जनतेची सेवा करण्यासाठी सत्तेत आलो आहोत. आणि ते करत असताना काय बोलतो, व्यवहार कसा आहे, हे सर्व जनता बघत असते. त्यामुळे त्यावर अंकुश असणे आवश्यक आहे, असे फडणवीस म्हणाले.
कृषिमंत्री कोकाटे यांच्यासंदर्भात सभागृहात जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता. त्याबाबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि खाते बदलाचा निर्णय घेतला. कृषी खाते हे भरणे यांना देण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.