सुराज्यासाठी काम करणार! नितीन गडकरी लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित

लोकमान्यांच्या नावाने स्वीकारलेल्या या पुरस्काराने आता जबाबदारी वाढली आहे. त्यांच्या स्वप्नातील सुराज्य तयार करण्यासाठी यापुढे काम करणार आहे, अशा भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.

लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते गडकरी यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी गडकरी बोलत होते. सत्ताकारण म्हणजे राष्ट्रकारण नाही. लोकमान्य टिळक आणि त्यांच्याप्रमाणे अनेकांनी जे केले ते राष्ट्रकारण होते. त्यांनी मिळवलेल्या स्वातंत्र्याचा ऑक्सिजन आपण घेत आहोत. त्यांना स्वराज्य पाहिजे होते आणि सुराज्यही. त्यांच्या स्वप्नातील सुराज्य तयार झाले पाहिजे, असे गडकरी म्हणाले. राजकारणात सत्य बोलणे अडचणीचे असते, तरीही सकारात्मकता ठेवून सत्य बोलणे गरजेचे असते, असे परखड भाष्य गडकरी यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, डॉ. प्रणती टिळक, डॉ. गीताली टिळक व्यासपीठावर उपस्थित होते.

अवघ्या दीड तासात पुणे ते मुंबई

मुंबई-बंगळुरू हायवे व्हाया पुणे या रस्त्याचे काम करणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे अवघा दीड तास लागेल. हा मार्ग पुण्याच्या रिंग रोडला जोडला जाईल. तर बंगळुरू फक्त 5 तासात येईल,अशी घोषणा नितीन गडकरी यांनी केली.