क्रिकेटवारी – सामना रंग दाखवतोय!

>>संजय कऱ्हाडे

पाचव्या कसोटीचा दुसरा दिवस मस्त! सुरुवातच तडकती-फडकती झाली. पहिल्या दिवशी बाकी राहिलेल्या हिंदुस्थानी फलंदाजांची खरकटी धुणी अॅटकिन्सन आणि टंग जोडीने फक्त 6.4 षटकांत धुतली. अॅटकिन्सनने 33 धावांत 5 बळी घेतले तर टंगने 57 धावांत 3 बळी घेतले. हिंदुस्थान सर्वबाद 224. अन् त्यानंतर डकेट आणि क्रॉलीच्या जोडीने हिंदुस्थानी गोलंदाजीच्या चिंधडय़ा उधळून दोरीवर वाळत घातल्या! जणू कोळीवाडय़ात बोंबिल-कोळंबी सुकण्यासाठी तारेवर लटकवलेल्या असाव्यात…

आकाशदीपच्या एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर बेन डकेट चकला. बॅटच्या खांद्यावरून उडालेला झेल शुभमनच्या पुढे पडला. त्यानंतरच्या चेंडूवर पायचीतचं अपील, डी.आर.एस., निर्णय ‘नाबाद’ आणि त्यानंतर आकाशदीपचा डकेटशी झालेला गोंडस संवाद! मग उलटय़ा स्कूपचा यष्टिरक्षकाच्या मागे फाइन लेगला डकेटने मारलेला षटकार. तस्साच षटकार सिराजच्या चेंडूवरही. अन् तोच फटका पुन्हा आकाशदीपला खेळताना डकेट (38 चेंडूंत 43 धावा) बाद झाला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या 92 होती. या बहारदार आणि धडाकेबाज रंगबाजीदरम्यान डकेट-क्रॉलीने  मिळून 16 चौकार अन् 2 षटकार ठोकले!  थोडक्यात, संवादाला डरकाळीने उत्तर दिलं…

संवाद धमाल, फलंदाजी कमाल अन् दर्शक क्रिकेटप्रेमी मालामाल

उपाहारानंतर मात्र बॅझबॉलचा बट्टय़ाबोळ झाला. सिराज, आकाशदीप आणि प्रसिद्धने शिस्तबद्ध, आक्रमक आणि खतरनाक गोलंदाजी केली. पोप, रूट आणि बेथेलला सिराजने पायचीत केलं आणि प्रसिद्धने क्रॉली, स्मिथ, अॅटकिन्सन आणि ओव्हरटनला बाद केलं. तेवढय़ात पावसकरांनी हजेरी लावली अन् लेखणी आवरती घ्यावी लागली..