Donald Trump – ट्रम्प खुश हुआ! हिंदुस्थाननं रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचं वृत्त

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ लादला. एवढेच नाही तर रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्र खरेदी केल्याने हिंदुस्थानला दंडीतही केले. सुरुवातीला अमेरिकेने लादलेला टॅरिफ 1 ऑगस्टपासून लागू होणार होता, मात्र नंतर याची मुदत 7 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. याच दरम्यान हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी तूर्तास थांबवल्याचे वृत्त ऐकण्यात आले असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी आनंद व्यक्त केला.

रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्र खरेदी केल्याने अमेरिकेने हिंदुस्थानला दंडीत केले होते. हा दंड नेमका काय हे समोर आले नव्हते. याचबाबत ‘एएनआय’ने डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारला. हिंदुस्थानवर विशेष दंड लावला जाईल का किंवा याबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार का? असे विचारले असता ट्रम्प म्हणाले की, ‘मी असे ऐकलंय की हिंदुस्थान आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. मला या वृत्तामध्ये किती तथ्य आहे हे माहिती नाही. पण हे एक चांगले पाऊल आहे. बघुया पुढे काय होतेय.’

हिंदुस्थान हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. 2022 पासून हिंदुस्थान सवलतीच्या दरामध्ये रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहे. मात्र अमेरिकेने टॅरिफ बॉम्ब फोडल्यानंतर आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे तेलाची वाहतूक करणे आव्हानात्मक झाल्याने हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी तात्पुरते थांबवल्याचे वृत्त आले. अर्थात केंद्र सरकारने यावर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र हिंदुस्थानने रशियासोबत तेल आणि शस्त्रास्त्र व्यापार थांबवावा असे अमेरिकेचे म्हणणे आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिनो यांनी रशिया-युक्रेन युद्धा दरम्यान हिंदुस्थान रशियाकडून सवलतीच्या दरात तेल आयात करत असल्याने टीका केली होती. याच दरम्यान ट्रम्प यांनी हिंदुस्थानातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लागू केला. एवढेच नाही तर रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्र खरेदी केले म्हणून दंडही केला.

अमेरिकेच्या निर्णयानंतर इंडियन ऑईल कॉर्प, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्प, भारत पेट्रोलियम कॉर्प आणि मंगलोर रिफायनरी पेट्रोकेमिकल लि. या कंपन्यांनी गेल्या आठवड्यात रशियाकडून तेल खरेदी केलेली नाही, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया दिली. हे चांगले पाऊल असल्याचे म्हणत त्यांनी आनंद व्यक्त केला.