
जनता दल सेक्युलर पक्षाचा माजी खासदार आणि पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याला कर्नाटक उच्च न्यायालयाने बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वर्षभरापासून या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू होती. शुक्रवारी (1 ऑगस्ट 2025) बंगळुरूच्या विशेष न्यायालयाने प्रज्वल रेवण्णाला दोषी ठरवले होते. आज विशेष न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
प्रज्वल रेवण्णा बलात्कारप्रकरणी दोषी, आज कर्नाटक उच्च न्यायालयाकडून शिक्षेची घोषणा
प्रज्वल रेवण्णावर त्याच्याच फार्माहाउसमध्ये काम करणाऱ्या एका 47 वर्षीय महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. 2021 पासून अनेकवेळा पीडितेवर बलात्कार करण्यात आला आणि याबद्दल कोणालाही सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचे सुद्धा पीडितेने म्हटले होते. मागील एक वर्षांपासून न्यायालयीन खटला सुरू होता. तसेच त्याच्यावर 50 हून अधिक महिलांवर त्याने लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप आहे. लोकसभा निवडणूक सुरू असतानाच 2024 मध्ये रेवण्णाच्या व्हायरल व्हिडीओचे प्रकरण समोर आले होते. मे 2024 मध्ये या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर आता 14 महिन्यांनी न्यायालयाने निकाल दिला आहे.